Pimpri News: ‘दिवाळी पहाट कार्यक्रमाला परवानगी नाही, फटाक्यांचा वापर टाळावा’

आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे आवाहन

एमपीसी न्यूज – फटाक्यांच्या धुराचा कोरोनाबाधित रुग्णांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी फटाक्यांचा कमीत कमी वापर करावा शक्यतो टाळावा, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरवासियांना केले आहे.

तसेच कोणतेही सामुदायिक, सांस्कृतिक, सार्वजनिक अशा सामाजिक एकत्रिकरण (दिवाळी पहाट) कार्यक्रमांना परवानी दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्प्ष्ट सांगितले आहे.

याबाबतच्या मार्गदर्शक सूचना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी जाहीर केल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साज-या होणा-या यंदाच्या दिवाळीत नागरिकांनी कोविड विषयक प्रतिबंधात्मक खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनाद्वारे सातत्याने व अहोरात्र पद्धतीने करण्यात आलेल्या सर्वस्तरीय प्रयत्नांमुळे आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात येत असल्याचे आकडेवारी वरुन दिसून येत आहे.

तरीही कोरोनाची संसर्गजन्यता अधिक असल्यामुळे सर्वांनीच अधिकाधिक काळजी काटेकोरपणे घेणे गरजेचे आहे. सुरक्षित अंतर, सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर आणि वारंवार साबणाने हात धुवावेत. फटाक्यांच्या धुराचा कोरोनाग्रस्त रुग्णांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे पालिका क्षेत्रात फटाक्यांचा कमीत कमी वापर करावा. शक्यतो टाळावा.

दिपावली हा प्रकाशाचा उत्सव मानला जातो. उत्सवादरम्यान दरवर्षी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. त्यामुळे वायू व ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढून जनसामान्यांच्या, प्राणीमात्रांच्या आरोग्यावर होणारे विपरित परिणाम दिपावली उत्सवानंतर बराच कालावधीपर्यंत दिसून येतात. कोरोना आजारामुळे परिणाम झालेल्या अनेकांना फटाक्यांच्या धुरामुळे वायू प्रदूषणाचा थेट परिणाम होऊन त्रास होण्याची भिती आहे. ही बाब विचारात घेऊन नागरिकांनी फटाके फोडण्याचे टाळावे.

पालिकेच्या मालकीच्या ठिकाणी उद्याने, मैदाने, पर्यटन स्थळे, शाळा इत्यादी ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फटाके फोडता येणार नाहीत. कोरोनाग्रस्त रुग्णांना त्रास होऊ नये यासाठी कमी आवाजाचे (ध्वनी प्रदूषण न होणारे), तसेच कमी धूर होणा-या फटाक्यांचा वापर करावा. सॅनिटायझर ज्वलनशिल असल्याने दिवे लावताना फटाके फोडताना सॅनिटायझरचा वापरा टाळावा. दिवाळीत हात धुताना सॅनिटायझरऐवजी साबण, हॅण्डवॉशचा वापर करावा.

या काळात कोणत्याही प्रकारचे सामुदायिक, सांस्कृतिक, सार्वजनिक अशा सामाजिक एकत्रीकरण (दिवाळी पहाट) कार्यक्रमांना परवानगी नसेल. ऑनलाईन पद्धतीने आयोजन करता येईल. खरेदी करण्यासाठी बाहेर जाणे गरजेचे असल्यास शक्यतो कमी गर्दीच्या वेळी, कमी गर्दीच्या ठिकाणी जाण्यास प्राधान्य द्यावे. योग्य ती खबरदारी घ्यावी. नियमांबाबत सहाय्यक आयुक्त, जनसंपर्क विभाग यांनी आपल्या कार्यक्षेत्रात सातत्याने जनजागृती करावी. नियम भंग करणारे, मास्कविना फिरणारे, गर्दी करणा-यांवर दंडात्मक कारवाई करावी. नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.