Pimpri: दिवसभरात एकही पॉझिटीव्ह रुग्ण नाही; 226 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह

आणखी तिघे कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांसाठी तब्बल 22 दिवसांनी दिलासादायक बातमी आहे. 22 दिवसानंतर आज (शुक्रवारी) संध्याकाळी सात वाजेपर्यंत शहरात कोरोनाचा एकही पॉझिटीव्ह रुग्ण सापडला नाही. शहरातील 226 कोरोना संशयितांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. तर, आज आणखी तीन जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील पण महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत अशा 120 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. आजपर्यंत 42 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, शहरातील तीन आणि महापालिका रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या शहराबाहेरील दोन अशा पाच जणांचा आजपर्यंत मृत्यू झाला आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेने गुरुवारी (दि. 30) कोरोना संशयितांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले होते. त्याचे रिपोर्ट आज आले आहेत. त्यामध्ये 226 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. तर, भोसरी, दिघी परिसरातील रहिवासी असलेले तीघे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांचे 14 दिवसांचे आणि त्यानंतरच्या 24 तासाचे असे दोनही रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे.

आजपर्यंत शहरातील 113 जणांना कोरोनाची लागण झाली. तर, पुणे महापालिका बाहेरील पण महापालिका रुग्णालयात दाखल असलेल्या आठ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. महापालिका रुग्णालयात सक्रिय 63 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शहरातील दहा रुग्णांवार महापालिका हद्दीबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, 42 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, शहरात 8 एप्रिलपासून 30 एप्रिलपर्यंत दररोज कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह येत होते. तब्बल 22 दिवसांनंतर त्यामध्ये खंड पडला आहे. आज दिवसभरात एकाचेही रिपोर्ट पॉझिटीव्ह आले नाहीत. ही दिलासादायक बाब मानली जात आहे.

आजचा वैद्यकीय अहवाल!

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 119

# पॉझिटीव्ह रुग्ण – 0

#निगेटीव्ह रुग्ण – 226

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 77

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 142

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 229

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 120

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 63

# शहरातील कोरोना बाधित दहा रुग्णांवर महापालिका क्षेत्राबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या –  5

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 42

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 14385

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 48056

दिघीतील हा परिसर सील

दिघी परिसरातील तनिष्क आयकॉन-सुदाम भेळ व पाणीपुरी-पाण्याची टाकी-कृष्णा अंगण कॉम्पलेक्स-ओम साई मिसळ हाऊस-आळंदी रोड हा परिसर आज शुक्रवारी मध्यरात्री 11 वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आला आहे. पुढील आदेशापर्यंत या परिसरात प्रवेशबंदी आणि परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.