Nodal Officer : माहिती व तंत्रज्ञान विषयक कामकाजासाठी प्रत्येक विभागात नेमणार ‘नोडल ऑफीसर’ 

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या सर्वच विभागांचे कामकाज संगणकावरच होत आहे. दैनंदिन कामात सुलभता आणि पारदर्शकतेसोबत गतिमानता यावी यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाअधिक वापर महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनातील विविध विभागांच्या माहिती व तंत्रज्ञान विषयक कामकाजाचा व्याप वाढत असल्याने सर्व विभागांमध्ये समन्वय राखण्यासाठी प्रशासनाने सर्व विभागात या कामांसाठी ‘नोडल ऑफीसर’ (Nodal Officer) नेमण्याचे आदेश दिले आहेत.

शहरातील नागरिकांना सुलभरीत्या सुविधा मिळाव्यात यासाठी महापालिका ऑनलाईन उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या कामकाजात दिवसेंदिवस माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. मात्र या कामकाजाबाबत जबाबदारी निश्‍चित नसल्याने तसेच माहिती तंत्रज्ञानाचे पुरेसे ज्ञान नसल्याने अनेकदा त्रुटी राहून जातात. यामुळे अगदी वेबसाईट अपडेट न होणे, तक्रार निवारण प्रणालीवरील तक्रारींचा पाठपुरावा न होणे, केलेल्या कार्यवाहीचा एकत्रित अहवाल नसणे अशा गोष्टींचा यामध्ये प्रामुख्याने समावेश होतो.

Pune News : रस्त्यावरील पार्कींगसाठी मोजावे लागणार जास्त पैसे

या पार्श्‍वभूमीवर सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी माहिती व तंत्रज्ञान विषयक कामकाजामध्ये समन्वय राखण्यासाठी प्रत्येक विभागामध्ये माहिती व तंत्रज्ञानाचे ज्ञान असलेल्या नोडल ऑफीसरची (Nodal Officer) नियुक्ती करण्याचे आदेश सर्व विभाग प्रमुखांना दिले आहेत.

या नोडल ऑफीसरने महापालिकेच्या संकेतस्थळावर आपल्या विभागाची माहिती अद्ययावत करणे, आपले सरकार, पी.जी.पोर्टल, पीएमसी केअर या तक्रारींसाठीच्या पोर्टलवर येणार्‍या तक्रारीं संबधित अधिकार्‍याच्या आदेशानुसार निरस्त करणे, विभागामार्फत वापरण्यात येणार्‍या प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणी आल्यास माहिती व तंत्रज्ञान विभागाशी संपर्क साधून दूर करणे, आपल्या विभागाचे सर्व मासिक व अन्य अहवाल प्रणालीमध्ये भरणे व संगणक विषयक अन्य कामांसाठी समन्वय साधण्याची जबाबदारी या नोडल ऑफीसरवर राहणार आहे.

सर्व विभागांनी 18 मेपर्यंत माहिती व तंत्रज्ञानाचे ज्ञान असलेल्या दोन सेवकांची आयटी नोडल ऑफीसर म्हणून नियुक्ती करावी, असे इथापे यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.