Delhi: भारत सरकारने ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कारा’साठी मागवले अर्ज

Nomination of Subhash Chandra Bose Aapda Prabandhan Puraskar for excellence in the field of Disaster Management दरवर्षी 23 जानेवारीला आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी दिला जातो पुरस्कार

एमपीसी न्यूज – भारत सरकारने 2020 या वर्षीच्या ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार’ साठी अर्ज मागवले आहेत. आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी हे पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारासाठी अर्ज करण्याची ऑनलाइन प्रक्रिया सध्या खुली आहे. व्यक्ती आणि संस्थांना आपले अर्ज 31 ऑगस्ट 2020 पर्यंत www.dmawards.ndma.gov.in या संकेतस्थळावरवर अपलोड करता येतील. प्रत्येक वर्षी 23 जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी हे पुरस्कार जाहीर केले जातात.

आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात व्यक्ती आणि संस्थांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याचा गौरव करण्यासाठी भारत सरकारने सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार सुरू केले आहेत. संस्थांसाठी 51 लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र तर व्यक्तीसाठी 5 लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र, असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

एखादी व्यक्ती पुरस्कारासाठी स्वतःचा अर्ज करु शकते तसेच इतर व्यक्ती किंवा संस्थेसाठीही नामांकन दाखल करु शकते. अर्ज केलेल्या व्यक्ती किंवा संस्थेने देशात, आपत्ती निवारण, प्रतिबंध, तयारी, बचाव, प्रतिसाद, मदत, पुनर्वसन, संशोधन, नाविन्य किंवा लवकर चेतावणी देणे यासारख्या आपत्ती व्यवस्थापनातील कोणत्याही क्षेत्रात काम केलेले असले पाहिजे.

आपत्तींचा परिणाम समाजातील सर्व स्तरातील लोकांचे जीवनमान, उदरनिर्वाह आणि मालमत्तेवर होतो. आपत्तींमुळे देशभर दया आणि निःस्वार्थ सेवेची भावना जागृत होते. आपत्तीनंतर, आपल्या समाजातील विविध घटक एकत्र येतात आणि आपत्तीमुळे पीडित लोकांचे दु: ख कमी करण्यासाठी प्रयत्न करतात.

आपत्तीचे निवारण, प्रभावी प्रतिसाद आणि आपत्ती नंतर सर्व पुन्हा पूर्वपदावर सुरू करण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांना समुदाय आधारित संस्था, नि:स्वार्थ स्वयंसेवक, समर्पित स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट, शैक्षणिक आणि संशोधन संस्था आणि व्यक्ती यांच्या अथक परिश्रमांमुळे बळ मिळतं.

बर्‍याच संस्था आणि व्यक्ती कुठलाही गाजावाजा न करता सातत्याने आपत्ती निवारण आणि तत्परतेवर काम करत आहेत जेणेकरून भविष्यातील आपत्तींचा परिणाम कमी होऊ शकेल. आपत्तींमुळे जनतेला होणारा त्रास कमी करण्यासाठी आश्वासकपणे कार्य करणार्‍या व्यक्ती आणि संघटनांच्या प्रयत्नांचा गौरव करण्याची गरज आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.