Corona Pimpri Update: शहरात फक्त कोरोनामुळे (Covid19) एकाचाही मृत्यू नाही

Not a single death only due to Covid19 in Pimpri Chinchwad, but had co morbidity. शहरात फक्त कोरोनामुळे एकाचाही मृत्यू नाही.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात फक्त कोरोना विषाणूची लागण झाल्याने एकाचाही मृत्यू झाला नाही. आजपर्यंत कोरोनासह विविध आजार असलेल्या शहरातील 11 आणि शहराबाहेरील पण वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असताना 15 अशा 26 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये फक्त कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झाला नाही. ज्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यांना विविध दुर्धर आजार होते. त्यामुळे दुर्धर आजार असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

राज्यातील पहिला कोरोना बाधित रुग्ण पिंपरी-चिंचवड शहरात सापडला होता. 10 मार्च रोजी एकाचदिवशी शहरातील तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. त्यानंतर एप्रिलपासून रुग्ण वाढीचे प्रमाण वाढले. बघता-बघता कोरोनाने संपुर्ण पिंपरी-चिंचवड शहराला विळखा घातला. 10 मार्च ते 4 जून पर्यंत शहरातील रुग्ण संख्या 607 वर जाऊन पोहचली आहे. त्यामध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे.

ही दिलासादायक बाब आहे. आजमितीला 243 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, तब्बल 353 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, शहरातील 11 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील मृत्यूचे प्रमाणही कमी आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा पहिला बळी 12 एप्रिल रोजी गेला. थेरगाव भागातील एका पुरुषाचा कोरोनासह विविध आजार असल्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर आज 4 जूनपर्यंत शहरातील 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, महापालिका हद्दीबाहेरील पण महापालिका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 15 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूमध्ये शहराबाहेरील रुग्णांची संख्या जास्त आहे.

मृत्यू झालेल्या या 26 रुग्णांपैकी एकाचाही फक्त कोरोनामुळे मृत्यू झाला नाही. प्रत्येक रुग्णाला कोणता ना कोणता तरी गंभीर आजार होता. त्यात कोरोनाची लागण झाली. त्यामुळे आजार बळावले. त्यातून त्यांचा मृत्यू झाला. पण, फक्त कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झाला नाही.

दुर्धर आजार असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी – आयुक्त हर्डीकर

पिंपरी-चिंचवड शहरातील 11 आणि शहराबाहेरील पण वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असताना 15 अशा 26 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या नागरिकांना कोरोनासह विविध आजार होते. फक्त कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झाला नाही.

त्यांना कोणता ना कोणता तरी गंभीर आजार होता. त्यामुळे गंभीर आजार असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी. कोरोना झाल्यानंतर बाकीच्या आजारांची लक्षणे वाढतात. त्यामुळे अधिकची खबरदारी घ्यावी , असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.