CSK vs PBKS : चेन्नई नाही तर पंजाबच ठरले सुपर किंग

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) : आयपीएल 2022 च्या आजच्या 11 व्या सामन्यात आज पंजाब किंग्ज संघाने बलाढ्य चेन्नई सुपर किंग्जला 54 धावांनी पराभूत करत आपली दमदार कामगिरी चालूच ठेवली. तर सलग तिसऱ्या पराभवाने गतविजेत्या चेन्नई संघाला या स्पर्धेत  पुन्हा वापस येण्यासाठी आता खडबडून जागे व्हावे लागणार आहे.

मुंबईच्या बेब्रोन मैदानावर झालेल्या आजच्या दिवसरात्र सामन्यात चेन्नई संघाचा कर्णधार रवींद्र जडेजाने आज नानेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पण पंजाब संघाने या निर्णयाला साफ चुकीचे ठरवले आणि लिविंगस्टोन,धवन, जितेश शर्माच्या उपयुक्त फलंदाजीमुळे आपल्या निर्धारित 20 षटकात 8 गड्याच्या मोबदल्यात 180 धावा उभा केल्या.

खरे तर पंजाब सुपर किंग्ज संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही, कर्णधार मयंकला ना आपल्या कीर्तीला साजेसा खेळ करता आला न कर्णधारपदाच्या जबाबदारीला न्याय देता आला,तो सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर मुकेश चौधरीच्या गोलंदाजीवर केवळ चार धावा काढून उथप्पाच्या हातात झेल देऊन तंबुत परतला,त्यानंतर थोड्याच वेळात आक्रमक भानुपक्षेही वैयक्तिक 9 धावा करून धावबाद झाला.यावेळी पंजाब संघांची धाव संख्या दोन बाद 14 अशी कठिण झाली होती, त्यानंतर मात्र अनुभवी शिखर धवन आणि लिविंगस्टोन यांनी जबाबदारीने खेळत डावाची सर्व सूत्रे आपल्या हातात घेत एक मजबूत आणि मोठी भागीदारी करून डाव सावरला.

लिविंगस्टोन जबरदस्त खेळत होता,त्याने धवन बरोबर तिसऱ्या गड्यासाठी 95 धावांची चांगली भागीदारी करून पंजाब संघाला सामन्यात परत आणले. धवन सुद्धा आपली जबाबदारी ओळखून खेळत होता, मात्र वैयक्तिक 33 धावांवर असताना तो द्वेन ब्रावोच्या गोलंदाजीवर कर्णधार जडेजाच्या सुरक्षित हातात झेल देऊन बाद झाला.यावेळी पंजाब संघाची धावसंख्या तीन बाद 109 अशी होती, याच धावसंख्येत फक्त सहा धावांची भर पडलेली असताना आपले आयपीएल मधले पहिले अर्धशतक आणि वैयक्तिक सर्वोच्च 60 धावा नोंदवून लिविंगस्टोन जडेजाच्या गोलंदाजीवर रायडूच्या हातात झेल देवून बाद झाला. त्यामुळे पंजाब संघ 4 बाद 115 अशा बिकट स्थितीत होता.

मात्र आयपीएल मध्ये आपले पदार्पण करणारा मूळचा अमरावतीकर असणाऱ्या जितेश शर्माने या कठीण परिस्थितीत कसलेही दडपण न घेता प्रगल्भता दाखवली आणि तळाच्या फलंदाजाना सोबत घेवून संघासाठी एक अत्यंत बहुमूल्य अशी 26 धावांची खेळी करून संघाला सावरले, त्याला राहुल चाहर आणि कगीसो रबाडाची  चांगलीच साथ मिळाली ज्यामुळे पंजाब किंग्जने आपल्या नावावर निर्धारित 20 षटकात 180 अशा सन्मानजनक धावा नोंदवल्या.चेन्नई संघाकडून ख्रिस जोर्डन व प्रिटोरियसने दोन दोन बळी मिळवून चांगली गोलंदाजी केली, पण महत्वाच्या क्षणी ते पंजाब फलंदाजीला खिळ घालू शकले नाहीत.जडेजा, ब्रावो आणि चौधरी यांनी प्रत्येकी एकेक बळी घेतला.

या आयपीएल मध्ये अजून एकदाही विजय नोंदवू न शकलेल्या चेन्नईला आज तरी आपला पहिला विजय मिळावा म्हणून 181 धावांची गरज होती, चेन्नई संघांची फलंदाजी बघता हे आव्हान फार मोठे वाटत नव्हतेही,पण …
ऋतुराज सलग तिसऱ्या सामन्यातही अपयशी ठरला, हे क्रिकेट  आहे,मागच्याच मोसमात खोऱ्याने धावा काढणाऱ्या ऋतूराजचा फलंदाजीचा ऋतू काही या मोसमात अजून तरी येईना. आजही तो फक्त 1 धाव काढून रबाडाची पहिली शिकार ठरला. तर त्याचा दुसरा जोडीदार रॉबिन उथप्पाला आज आपल्या पहिल्याच आयपीएल सामन्यात पदार्पण करणाऱ्या वैभव अरोराने मयंकच्या हातात झेल घ्यायला लावून आपला पहिला बळी घेतला.

त्यानंतर आलेल्या आक्रमक मोईन अलीला तर भोपळा ही फोडता आला नाही. त्यालाही नवोदित वैभव अरोरानेच त्रिफळाबाद करून आपला दुसरा बळीही नोंदवला.यामुळे चेन्नई संघाची अवस्था 3 बाद 22 अशी बिकट झाली होती,या धक्क्यातून सारवण्याआधीच कर्णधार जडेजा सुद्धा अर्षदीपच्या गोलंदाजीवर खाते न उघडताच त्रिफळा बाद झाला.चॅम्पियन संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी आपल्या खांद्यावर आल्यानंतर जडेजा अद्यापही त्या संधीचे सोने करू शकला नाही आणि न्यायही देऊ शकला नाही. फलंदाजीत त्याला काही खास करता आलेले नाहीच. नेतृत्व करतानाही तो काही खास छाप पाडू शकला नाही.आजही संघाला गरज असताना तो भोपळा न फोडताच संघाच्या अडचणीत भर पाडून तंबुत परतला.

चार  बाद 23 अशी कठीण आणि लाजिरवाणी अवस्था असताना मैदानावर आला तो नवोदित शिवम दुबे. त्याने अंबाती रायडूसोबत खेळ पुढे चालू ठेवला. पण आज अंबाती रायडू सुद्धा विशेष काही करू शकला नाही आणि केवळ 13 धांवा करून ओडियन स्मिथच्या गोलंदाजीवर  बाद झाला. या कठीण परिस्थितीत शिवम दुबेला साथ देण्यासाठी होता माजी कर्णधार आणि जगातला सर्वोत्कृष्ट फिनिशर म्हणून ओळखला जाणारा माही. या जोडीने सहाव्या गड्यासाठी चांगली आणि आक्रमक खेळताना 62 धावांची भागीदारी करून थोडीफार आशा दाखवली.

शिवम दुबे अतिशय सुंदर खेळत होता. त्याने बघताबघता आपले पहिले अर्धंशतक पूर्ण केले तेही केवळ 25 चेंडूत ज्यामधे  सहा चौकार आणि तीन देखणे षटकार सामील होते. मात्र आपल्या अर्धशतक गाठल्यानंतर आणि जम बसल्यानंतर तो 57 धावा काढून लिविंगस्टोनच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि चेन्नई संघाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. यातून सावरण्याआधीच लिविंगस्टोनने पुढच्याच चेंडूवर द्वेन ब्राव्होलाही चकवले आणि चेन्नई संघ पूर्णपणे अडचणीत आला. तरीही एका बाजूने अतिशय थंड डोक्याचा माही असल्याने आणि क्रिकेट मध्ये कधीही काहीही होवू शकते हे माहीत असल्याने काहीतरी चमत्कार आजही होईल अशी वेडी आशा बाळगून सामना बघणाऱ्या रसिकांना आज तरी काहीही चमत्कार बघायला मिळाला नाही.

या  पराभवाच्या अंधारात एकमेव आस  असणारा माहीला राहुल चाहरने आपल्या फिरकीच्या जाळ्यात फसवले पण त्याने केलेलं झेलबादचे अपिल पंचांनी फेटाळून लावल्यानंतर नवोदित यष्टीरक्षक जितेश शर्माने अतिशय आत्मविश्वासाने  कर्णधार मयंकला रिव्यु घ्यायला लावले आणि त्यात धोनी बाद असल्याचे स्पष्ट होताच चेन्नई संघांची सर्व आशाआकांक्षाची राखरांगोळी झाली आणि चार वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या माजी विजेत्या चेन्नई संघाला आपल्या लागोपाठ तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यातही दुःखद बात अशी की बलाढ्य चेन्नई संघ पुणे 20 षटके सुद्धा खेळू शकला नाही आणि अठराव्या षटकातच 126 धावात चेन्नई संघ गारद झाला. ज्यामुळे त्यांना 54 धावांचा मोठा पराभव स्विकरावा लागला.

पंजाब संघाकडून राहुल चाहरने तीन तर वैभव अरोरा व लिविंगस्टोनने प्रत्येकी दोन बळी मिळवून चेन्नई संघाला चारीमुंडया चित केले. उत्तमफलंदाजी सोबतच गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही उत्तम कामगिरी करणाऱ्या लिविंगस्टोनला सामन्याचा मानकरी म्हणून सन्मानित केले.

संक्षिप्त धावफलक

पंजाब किंग्ज 
20 षटकात 8 बाद 180
लिविंगस्टोन 60,धवन 33,जितेश शर्मा 26,रबाडा 12,राहुल चाहर 12
जोर्डन 23/2,प्रिटोरियस 30/2

विजयी विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
18 षटकात सर्वबाद 126
दुबे 57,धोनी 23,रायडू 13
राहुल चाहर 23/3,लिविंगस्टोन 25/2,.वैभव अरोरा 21/2

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.