Pimpri : मानधन वसुलीची कुंदन गायकवाड यांना नोटीस 

अडीच लाख रुपये पालिकेत भरावे लागणार 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपचे कुंदन गायकवाड यांचे नगरसेवकपद रद्द केल्यानंतर त्यांना नगरसचिव विभागाने मानधन वसुलीची नोटीस बजाविली आहे. मासिक मानधन आणि सभांची उपस्थिती भत्ता असे एकूण दोन लाख 54 हजार 968 रुपये गायकवाड यांना महापालिकेत जमा करावे लागणार आहेत. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी 2017 मध्ये झाली. या निवडणुकीत कुंदन अंबादास गायकवाड हे चिखली प्रभाग क्रमांक एकमधून भाजपच्या तिकीटावर विजयी झाले. त्यांनी कैकाडी जातीचा दाखला सादर करत अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडणूक लढविली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना उमेदवार नितीन दगडू रोकडे यांनी कुंदन गायकवाड यांच्या जात दाखला आणि जात प्रमाणपत्र पडताळणीवर हरकत घेतली. गायकवाड यांचा जात दाखला अवैध असल्याचा निर्णय बुलढाणा जिल्हा विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने मंगळवारी (दि.29) दिला होता.

त्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पाच ऑक्टोबर रोजी कुंदन गायकवाड यांचे नगरसेवक पद्द रद्द केले आहे. त्यामुळे आतापर्यंत नगरसेवक म्हणून गायकवाड यांना दिलेले सर्व भत्ते महापालिका प्रशासनाकडून वसूल केले जाणार आहेत. त्यानुसार मासिक मानधन आणि सभांची उपस्थिती भत्ता असे एकूण दोन लाख 54 हजार 968 रुपये महापालिकेत जमा करा, अशी नोटीस नगरसचिव कार्यालयाने गायकवाड यांना बजावली आहे.

दरम्यान, आपल्या जात प्रमाणपत्राची फेरतपासणी करण्याचे आदेश नागपूर खंडपीठाने बुलडाणा जात पडताळणी समितीला दिले असल्याचा दावा कुंदन गायकवाड यांचा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.