Pimpri News : शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करा; स्थायी समितीची आयुक्तांना सूचना

एमपीसी न्यूज – पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे प्रशासनाने दिलेले आश्वासन अनेकदा फोल ठरले आहे. पूर्ण दाबाने व सुरळीत पाणी पुरवठा व्हावा ही सर्व लोकप्रतिनिधींची मागणी आहे. मागील पंधरा दिवसांपासून शहरातील सर्वच भागातील नागरिकांच्या पाणी पुरवठ्याबाबत तक्रारी येत आहेत. यावर आयुक्तांनी ताबडतोब निर्णय घेऊन सर्व शहरातील पुर्ण दाबाने पाणी पुरवठा सुरळीत करावा असा सूचना स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी दिल्या.

हॉकी इंडिया यांच्या मान्यतेने आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व इतर संस्थांच्या संयुक्त विद्यमाने होणा-या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेची घोषणा करण्यासाठी बुधवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेचे पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौरांना निमंत्रण देण्यात आले नाही. याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

हॉकी इंडिया यांच्या मान्यतेने आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय व हॉकी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘11 वी हॉकी इंडिया वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा 2021’ हि स्पर्धा 11 ते 22 डिसेंबर या काळात होणार आहे. पिंपरीतील मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास स्टेडियम येथे होणा-या स्पर्धेसाठी 32 लाख 25 हजार 974 रुपयांच्या खर्चास मंजूरी देण्यात आली.

या स्पर्धेची घोषणा बुधवारी महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, क्रीडा विभागाच्या सहाय्यक आयुक्त आणि संबंधित संस्थेच्या पदाधिका-यांनी पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकार परिषद घेऊन केली. परंतू यावेळी पिंपरी चिंचवड शहराच्या महापौरांना का डावलण्यात आले असा सवाल करत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

कोरोनाच्या ‘ओमायक्रॉन’ व्हेरिएंट बाबत केंद्र व राज्य सरकारने सांगितलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करावे. तसेच पिंपरी चिंचवड शहरातील जवळपास 92 टक्के नागरिकांनी पहिला आणि 60 ते 62 टक्के नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे. ज्यांनी लस घेतली नाही. त्यांनी लवकरात लवकर लस घ्यावी. मास्क वापरावा आणि सामाजिक अंतर पाळावे असेही आवाहन स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.