Chakan : कुख्यात गुन्हेगार अनिकेत नाणेकर टोळीतील सराईत गुन्हेगाराला अटक

एमपीसी न्यूज – चाकण भागातील कुख्यात गुन्हेगार अनिकेत नाणेकर टोळीचा सदस्य सागर परदेशी याला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

सागर सुदाम परदेशी (वय 26, रा. नाणेकरवाडी, ता. खेड. जि. पुणे), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस चाकण परिसरात रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासत होते. पोलीस शिपाई गणेश सावंत यांना आज (बुधवारी) माहिती मिळाली की, नाणेकरवाडी चाकण येथील शहा पेट्रोल पंपावर एक सराईत गुन्हेगार थांबला आहे. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून सागर याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीची पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे मिळाली. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

सागर परदेशी हा चाकण परिसरातील कुख्यात अनिकेत नाणेकर टोळीचा सदस्य आहे. 2014 साली चाकण-तळेगाव रोडवर पानटपरी चालक अमोल ज्ञानेश्वर डांगले याला आरोपी सागर परदेशी आणि त्याचे साथीदार बाबाशा नाणेकर, अनिकेत नाणेकर, संतोष गुजर, विशाल गुजर, कुसुमबाई नाणेकर यांनी धमकी देत खंडणी मागितली. याबाबत त्यांच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यावरून या आरोपींवर पोलिसांनी मोक्काची कारवाई केली. यामध्ये आरोपी सागर तीन वर्ष त्याच्या साथीदारांसोबत कारागृहात होता.

सागर याच्याकडे असलेल्या पिस्तुलबाबत विचारणा केली असता ते त्याच्या आरोपी साथीदारांनी दिले असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उप आयुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, उपनिरीक्षक काळुराम लांडगे, पोलीस कर्मचारी गणेश सावंत, प्रवीण पाटील, विजय मोरे, प्रमोद लांडे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.