Pune News : आता विना हेल्मेट वाहन चालवल्यास लायसेन्स होणार रद्द

एमपीसी न्यूज – विना हेल्मेट वाहन चालविणे नागरिकांना आता चांगलेच महागात पडणार असून, नव्या कायद्यानुसार तीन महिने वाहन परवाना (लायसेन्स) निलंबनाची कारवाई होणार आहे, तर दंडाच्या रकमेतदेखील वाढ करण्यात आली असून, एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

मोटार वाहन कायदा 2019 मध्ये बदल करीत दंडाच्या रकमेत मोठी वाढ करण्यात आली होती. एक डिसेंबरपासून राज्यात या नव्या कायद्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. हेल्मेट नसल्यास पूर्वी 500 रुपये दंड आकारला जात होता. यामुळे अनेक वाहनधारक दंड भरून निघून जात होते. परंतु, आता दंडाच्या रकमेत वाढ करीत एक हजार दंड आकारण्यात येणार आहे.

तर, तीन महिने वाहन परवाना निलंबित करण्याची तरतूद देखील करण्यात आली आहे. परवाना नसताना वाहन चालविल्यास पूर्वी एक हजार रुपये दंड होता. यात वाढ करीत आता तो पाच हजार रुपये एवढा करण्यात आला आहे.

सीटबेल्ट नसल्यास पूर्वी दोनशे रुपये असलेला दंड आता एक हजार रुपये एवढा झाला आहे. धोकादायक पद्धतीने वाहन चालविणाऱ्यांना एक ते पाच हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे. वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणाऱ्यांनादेखील या तरतुदीनुसार दंड केला जाणार आहे.

नव्या कायद्याची अंमलबजाणी राज्यात सुरू करण्यात आली आहे. याबाबत परिवहन आयुक्त कार्यालय कारवाई सुरू केली आहे. वाहतूक पोलीसदेखील वाहनांवर कारवाई करतात. त्यामुळे पोलिसांनादेखील आता या पद्धतीने कारवाई करता येणार असून, तशा सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रादेशिक परिवहन कार्यालयकडून (आरटीओ) जिल्हा माहिती अधिकारी यांना याबाबत पत्र लिहून कळविले आहे. त्यामुळे नागरिकांना आता काळजी घ्यावी लागणार आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.