Pune : साहित्य खरेदीवर आता ‘मटेरिअल मॅनेजमेंट अ‍ॅप’चा वॉच

एमपीसी न्यूज : महापालिकेच्या विविध विभागाच्या वतीने वर्षांला तब्बल शंभर ते सव्वाशे कोटी रुपयांची विविध प्रकारच्या वस्तू खरेदी केल्या जातात. परंतु कोणत्या विभागाने नक्की किती खरेदी केली, प्रत्येक्ष किती वस्तू आल्या हे तपासण्यासाठी कोणतही ठोस यंत्रणा महापालिकेकडे नाही. यामुळेच महापालिकेच्या वस्तू खरेदीवर वॉच ठेवण्यासाठी प्रशासनाने आता खास मटेरिअल मॅनेजमेंट स्वतंत्र अ‍ॅप विकसित केले आहे. या अ‍ॅपमुळे कोणत्या विभागाला कशाची गरज आहे, किती वस्तू खरेदी केल्या, प्रत्यक्ष किती आल्या याची कार्यालयात बसून माहिती उपलब्ध होणार आहे.

महापालिकेच्या विविध विभागामार्फत साहित्य खरेदी करताना मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याच्या अनेक तक्रारी सातत्याने येतात. महापालिकेच्या वतीने आतापर्यंत कोणत्याही वस्तूची खरेदी करताना निविदा प्रक्रिया राबवून अथवा शासनाने निश्चित केलेल्या दर सुचीनुसार वस्तूची खरेदी केली जात होती. परंतु यामध्ये प्रशासनाकडून अनेक पळवाटा काढून चढ्या दराने वस्तू खरेदी करण्यात येत होत्या. वस्तू खरेदीतील गैरप्रकार टाळण्यासाठी केंद्र शासनाने सर्व शासकीय कार्यालयांसाठी आॅनलाईन खरेदी (जीईएम) पोर्टलचा पर्याय समोर आणला.

या जीईएम पोर्टलवर सध्या वाहनापासून ते थेट पेन, पेन्सिलपर्यंत सर्व वस्तू उपलब्ध आहेत. आॅनलाईन खरेदीने महापालिकेचे पैसे काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली आहे. परंतु नक्की कोणत्या विभागाला किती वस्तूची गरज आहे, किती खरेदी केल्या व प्रत्यक्ष किती वस्तू त्या विभागाला मिळाल्या याबाबत वरिष्ठ अधिका-यांना माहिती मिळणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. यामुळे महापालिका प्रशासनाच्या वतीने स्वतंत्र मटेरिअल मॅनेजमेंट हे स्वतंत्र अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.