Pimpri : शिक्षकांनाही मिळणार आता ‘धन्वंतरी’चा लाभ

आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश

शिक्षण समिती सभापती सोनाली गव्‍हाणे यांची माहिती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत शिक्षकांना अखेर धन्वंतरी योजनेचा लाभ देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंजूर केला आहे. गेल्या 25 वर्षांपासून शिक्षकांची ही मागणी मंजुरीच्या प्रतीक्षेत होती. विशेष म्हणजे, सेवानिवृत्त शिक्षकांनाही या विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे या निर्णयाचे शिक्षण क्षेत्रातून स्वागत होत आहे. याबाबतची माहिती शिक्षण समिती सभापती सोनाली गव्‍हाणे यांनी दिली. 

भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे सभागृहात नुकत्याच झालेल्या मेळाव्यात शहरातील शासकीय आणि निमशासकीय तसेच खासगी शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी आमदार महेश लांडगे यांना ‘धन्वंतरी’  योजना लागू करण्याबाबत साकडे घातले होते. महापालिका प्रशासनाकडे प्रलंबित असलेला हा विषय लवकरात लवकर मार्गी लावला जाईल, असे आश्वासन आमदार लांडगे यांनी शिक्षकांना दिले होते.

आमदार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण समितीच्या सभापती सोनाली गव्‍हाणे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील सेवेतील, तसेच सेवानिवृत्त शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वैद्यकीय उपचारांसाठी धन्वंतरी स्वास्थ्य योजना लागू करण्याची शिफारस प्रशासनाकडे करण्यात आली.

पिंपरी- चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने सर्व कर्मचा-यांना धन्वंतरी योजना लागू केली होती. मात्र, शिक्षकांना या योजनेतून वगळण्यात आले होते. सुमारे 100 शिक्षक आणि सेवानिवृत्त शिक्षकांनाही या योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे शिक्षकांना आरोग्य वीमा योजनेचे सर्व फायदे मिळणार आहेत, अशी माहिती पदविधर प्राथमिक शिक्षक संघटनेचे सचिव हरिष चौधरी यांनी दिली.

शिक्षण समिती सभापती सोनाली गव्‍हाणे म्हणाल्या की, ‘शहर आणि परिसरातील तब्बल 98 रुग्णालयांचा समावेश धन्वंतरी स्वास्थ योजनेमध्ये आहे. महापालिका प्रशासनातील सर्व कर्मचा-यांना या योजनेचा लाभ मिळत होता. मात्र, शिक्षकांना त्यातून वगळण्यात आले होते. आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने आम्ही त्याबाबत प्रशासनाकडे यशस्वी पाठपुरावा केला. त्याद्वारे आमदार लांडगे यांनी शिक्षकांना दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.