Pimpri News : आता ‘क’ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गतचे नगरसेवक जाणार जम्मू-कश्मीर दौऱ्यावर!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील महिला व बाल कल्याण समिती सभापतींसह सात सदस्य केरळ दौरा करुन आल्यानंतर आता ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गतचे सर्व नगरसेवक आणि चार अधिकारी-कर्मचारी जम्मू व कश्मीर येथे मार्चमध्ये अभ्यास दौ-यासाठी जाणार आहेत. दौ-यासाठी येणा-या प्रत्यक्ष खर्चास स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.

_MPC_DIR_MPU_II

या दौ-यामध्ये ‘स्वच्छ भारत’ अभियानाअंतर्गत शहर स्वच्छता, कचरा विल्हेवाट, शाळांमधील स्वच्छता प्रकल्प, पर्यटनस्थळावरील स्वच्छता नियोजन आदी बाबींची पाहणी नगरसेवक करणार आहेत. संबंधित महापालिकांनी राबविलेल्या चांगल्या योजना , प्रकल्पांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत अंमलबजावणी करता येईल का, यावर अभ्यास करण्यात येणार आहे.

महापालिका ‘क’क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत 16 नगरसेवक आणि तीन स्वीकृत सदस्य आहेत. या 19 जणांसह चार अधिकारी कर्मचारी असे 23  जण या दौ-यात सहभागी होणार आहेत. यासाठी येणा-या प्रत्यक्ष खर्चाच्या ठरावास ‘क’ क्षेत्रीय समितीच्या 2 फेब्रुवारी 2021 रोजीच्या मासिक सभेत मंजुरी देण्यात आली. या अभ्यास दौ-यासाठी येणा-या प्रत्यक्ष खर्चास बुधवारी झालेल्या स्थायी समिती सभेत आयत्यावेळी मान्यता देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.