Pimpri News: नगरसेवकांचे दौरे  सुरुच! आता ‘क’, ‘इ’ प्रभागातील नगरसेवक जाणार गोव्याला

एमपीसी न्यूज – कार्यकाल संपुष्टात येत असताना आणि ओमायक्रॉन, कोरोनाचे संकट पुन्हा वाढत असतानाही पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांचे अभ्यास दौरे सुरुच आहेत. स्थायी समिती, क्रीडा, शहर सुधारणा समिती, ‘फ’ प्रभाग समितीनंतर आता ‘क’ आणि ‘इ’ प्रभागातील नगरसेवक दौ-यावर जाणार आहेत. विशेषम्हणजे हे सदस्य स्वच्छ भारत अभिनायाअंतर्गत पर्यटनस्थळ अशी ओळख असलेल्या गोव्यातील पणजी आणि पंजाबमधील चंदीगडच्या दौ-यावर जाणार आहेत. त्यासाठी येणा-या प्रत्यक्ष खर्चास स्थायी समितीने बुधवारी (दि.29) आयत्यावेळी मान्यता दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणे अपेक्षित आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा तिढा, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको असा विधीमंडळाने ठराव केला असला तरी राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे नियोजित वेळेत निवडणूक झाल्यास जानेवारी 2022 अखेरपर्यंत आचारसंहिता लागू शकते. ओमायक्रॉन, कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे जर निवडणूका लांबणीवर गेल्या. तरी, विद्यमान नगरसेवकांचा  कार्यकाल  12 मार्च 2022 पर्यंत आहे. म्हणजेच केवळ दोन महिन्यांचा कालावधी राहतो. त्यामुळे महिना, दोन महिने कालावधी राहिला असताना अभ्यास दौ-याच्या नावाखाली नगरसेवक करदात्यांच्या पैशांतून फिरुन घेत असल्याचा आरोप होऊ लागला आहे.

स्थायी समिती, क्रीडा, शहर सुधारणा समिती, ‘फ’ प्रभाग समितीचे सदस्य इंदूर, पंजाब, हरियानाच्या दौ-यावर जाणार आहेत. त्या दौ-याकरिता येणा-या खर्चाला मागील आठवड्यात झालेल्या स्थायी समिती सभेत आयत्यावेळी मान्यता दिली होती. आता बुधवारी (दि.29) झालेल्या स्थायी समिती सभेत ‘क’ आणि ‘इ’ प्रभागातील नगरसेवकांच्या अभ्यास दौ-यासाठी येणा-या खर्चाला मान्यता दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आठ क्षेत्रीय कार्यालये आहेत. प्रत्येक कार्यालयाच्या हद्दीत 16 नगरसेवक येतात. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ‘क’ क्षेत्रीय कार्यालयातील नगरसेवक आणि प्रभागातील अधिका-यांचा पणजी, चंदीगड अभ्यास, पाहणी दौरा करण्यास समितीने 9 नोव्हेंबर रोजी ठराव मंजूर केला. तर, ‘इ’ प्रभागातील नगरसेवक, अधिका-यांच्या पणजी, चंदीगड दौ-याचा ठराव समितीने 27 डिसेंबर 2021 रोजी केला. या दौ-यासाठी येणा-या प्रत्यक्ष खर्चास स्थायी समितीने बुधवारी आयत्यावेळी मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.