Nigdi : भौतिक, आध्यात्मिक व नैतिकदृष्ट्या देश स्वच्छ करणे हे सध्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य – अविनाश धर्माधिकारी

स्थिर प्रात्यक्षिकांद्वारे दिला ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या गणरायाला निरोप

एमपीसी न्यूज – भौतिक, आध्यात्मिक व नैतिकदृष्ट्या देश स्वच्छ करणे हे सध्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे असे विचार स्वच्छता अभियानातून राष्ट्रीय वृत्ती घडण या विषयावर मार्गदर्शन करताना माजी सनदी अधिकारी व अभ्यासक अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. 

निगडी येथील ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या वतीने यंदा गणेशोत्सवातील अनिष्ट रुढी, परंपरा, सार्वजनिक गणेशोत्सवाला येत चाललेले वेगळे रुप याविषयी विद्यार्थी व जनमानसात वैचारिक प्रबोधन व्हावे या हेतूने  विविध उपक्रम राबवण्यात आले. त्यानिमित्ताने स्वच्छता या विषयावर विविध मान्यवरांचे मार्गदर्शक विचार मांडण्यात आले. सार्वजनिक व कौटुंबिक गणेशोत्सवाला विधायक वळण कसे देता येईल, स्वच्छता चळवळ कशी राबवता येईल याविषयी व्याख्यानांच्या माध्यमातून विविध वक्त्यांनी आपले विचार व्यक्त केले. शनिवारी (२२ सप्टेंबर)स्वच्छता अभियानातून राष्ट्रीय वृत्ती घडण या विषयावर अविनाश धर्माधिकारी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. गिरीश आफळे, डॉ. गीता आफळे, ज्ञान प्रबोधिनीचे उपकेंद्रप्रमुख मनोज देवळेकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

अविनाश धर्माधिकारी पुढे म्हणाले की, हाती घेतलेले काम उत्तम करणे हीच मातृभूमीची सेवा आहे. कधी नव्हे ती आपल्या देशाच्या खुद्द पंतप्रधानांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. त्यांनी मंदिराऐवजी स्वच्छतागृहे बांधावीत असे नागरिकांना आवाहन केले आहे. दुर्दैवाने आपण कुठल्याही गोष्टीचे कर्मकांडात आणि दिखाव्यात लगेच रुपांतर करतो. कुठल्याही मोहिमेची थट्टा करतो. मात्र आपली तीर्थक्षेत्रेदेखील खूप अस्वच्छ असतात. या स्वच्छता मोहिमेला जनआंदोलनाचे रुप मिळाले तरच बदल घडणार आहेत. सध्या हळूहळू बदल होत आहे. ही जनतेची चळवळ होऊ लागली आहे. धर्म, अध्यात्माच्या मुखातून हे सर्व विचार आले की आपण सजग होतो.

सध्या गंगेची आरती होण्याआधी तिथले मुख्य पुजारी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देतात. त्यानंतर हजारो जण एका सुरात ती शपथ घेतात.  त्यावेळी हे संस्कार घेऊन प्रत्येकजण आपल्या घरी गेला तरी हे स्वच्छतेचे बीज आपोआप रुजेल. जेथे भावना आणि बुद्धीचा संघर्ष नसतो, जिथे त्यांची एकात्मता होते तिथेच परिवर्तन होते. सरकार या विविध मोहिमा करेलच, पण स्वच्छता राखणे ही आपली देखील जबाबदारी आहे. सामाजिक शिस्त पण खूप गरजेची आहे. फक्त कायद्याने या गोष्टी होणार नाहीत. शुद्ध मनाची माणसे एकत्र आली तर देशाची वाटचाल नक्कीच स्वच्छतेकडे होईल असा आशावाद त्यांनी या निमित्ताने जागवला.

रविवारी एका वेगळ्या पद्धतीने ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयाने एका वेगळ्या पद्धतीने गणरायांना निरोप दिला. दहा दिवस चाललेल्या गणेशोत्सवाची सांगता सुरुवातीला अथर्वशीर्ष पठण, उत्तरपूजा झाली. विसर्जन प्रात्यक्षिकांमध्ये इयत्ता सातवीचा पन्नास विद्यार्थ्यांचा लेझीम गट, युवक व युवतींचा वाद्य गट, आठवी ते दहावीच्या ५०० विद्यार्थ्यांचा बरचीचा गट, काही माजी विद्यार्थिनी ज्या आता विद्यालयात शिक्षिका आहेत अशा पंचवीस जणींचा गट सहभागी होता.

या स्थिर प्रात्यक्षिकांसाठी थेरगाव फाउंडेशनचे अध्यक्ष अनिकेत प्रभू आणि शरयूनगर मित्रमंडळाचे अध्यक्ष नितीने ढमाले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. मागील वर्षापासून विसर्जन मिरवणूक टाळून स्थिर प्रात्यक्षिके करुन विद्यालयातच कृत्रिम कुंभात गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते. यंदादेखील तोच पायंडा पुढे चालवत श्रींचे विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव प्रमुख वैदेही पत्की हिने कृत्रिम कुंभात केले. यावेळी  ज्ञान प्रबोधिनीचे उपकेंद्रप्रमुख मनोज देवळेकर व गणेशोत्सव मार्गदर्शक मधुरा लुंकड उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.