Pimpri News: आता विधी समिती, ‘अ’, ‘फ’ प्रभागातील नगरसेवक जाणार दौऱ्यावर

नगरसेवकांचा अभ्यास दौऱ्यांचा सपाटा सुरूच 

एमपीसी न्यूज – कोरोनाची परिस्थिती असतानाही पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांचा दौ-यांचा मोह सुटत नाही. दौ-यांचा सपाटा सुरुच आहे. महिला व बालकल्याण समितीनंतर आता विधी समितीच्या सभापतींसह नऊ सदस्य सिक्किम दौ-यावर, ‘अ’ प्रभाग कार्यालयातील नगरसेवक चंदिगड आणि ‘फ’ प्रभागातील नगरसेवकांना जम्मू व कश्मीर दौ-यावर जायचे आहे. यासाठी येणा-या खर्चास आज (बुधवारी) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

विधी समिती सदस्यांना कायदा सुव्यवस्थेची पाहणी करण्याकरिता अभ्यास दौ-याचे आयोजन केले जाते. अभ्यास दौरा करण्याकरिता सिक्किम या राज्यातील कायदा व्यवस्थेची पाहणी करण्याकरिता विधी समिती सभापतींसह नऊ सदस्य, संबंधित अधिकारी दौ-यात जाणार आहेत.

‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गतचे 16 नगरसेवक, तीन स्वीकृत सदस्य आणि तीन अधिकारी असे 22 जण चंदिगड येथे अभ्यास दौ-यासाठी जाणार आहेत. चंदिगड हे सुनियोजित विकसित शहर असल्याने त्या शहरातील महापालिकेने राबविलेल्या विविध योजना, प्रकल्पांची पाहणी, पर्यटन स्थळांची पाहणी करुन त्यातील चांगल्या योजना, प्रकल्पांची अमंलबजावणी शहरात केली जाणार आहे.

चंदिगड, मनाली, सिमला येथील विविध प्रकल्पांची पाहणी दौरा मार्च, एप्रिल 2021 मध्ये करण्यासाठी प्रभाग समितीच्या बैठकीत 12 फेब्रुवारी रोजी मान्यता दिली. या दौ-यास येणा-या प्रत्यक्ष खर्चास आज स्थायी समितीने मान्यता दिली.

‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गतचे सर्व नगरसेवक आणि चार अधिकारी-कर्मचारी जम्मू व कश्मीर येथे अभ्यास दौ-यासाठी जाणार आहेत. ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत 16 नगरसेवक आणि तीन स्वीकृत सदस्य आहेत. या 19 जणांसह चार अधिकारी कर्मचारी असे 23 जण या दौ-यात सहभागी होणार आहेत.

दौ-यामध्ये शहर स्वच्छता, कचरा विल्हेवाट, घनकचरा व्यवस्थापन, तसेच इतर प्रकल्पांची पाहणी, पर्यटन स्थळांची पाहणी केली जाणार आहे. महत्वाच्या शहरांना भेटी दिल्या जाणार आहेत. या दौ-याला प्रभागाच्या 4 फेब्रुवारीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यासाठी येणा-या खर्चास स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.

दरम्यान, ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गतचे सर्व नगरसेवक आणि चार अधिकारी-कर्मचारी जम्मू व कश्मीर येथे मार्चमध्ये अभ्यास दौ-यासाठी जाणार आहेत. या दौ-यासाठी येणा-या प्रत्यक्ष खर्चास मागील स्थायी समितीच्या बैठकीत आयत्यावेळी मान्यता दिली गेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.