Motivational: आता गरज पुढच्या पिढीला मूल्यशिक्षण देण्याची…

Now the need is to value education to the next generation आजकाल होतं काय की आपल्याला असे इंग्रजीतले डेमो देत केलेले व्हिडिओ असले की सगळं लगेच पटतं. पण याच जीवनशिक्षणाच्या महत्वाच्या गोष्टी आपल्याला आपल्या पारंपरिक कहाण्यांमधून पूर्वी मिळत असे.

एमपीसी न्यूज – काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ पाहण्यात आला. सध्याच्या भाषेत ज्याला मोटिव्हेशनल व्हिडिओ म्हणतात असा तो होता. त्यात एकजण उपस्थितांना एका उच्चपदस्थाची गोष्ट सांगत होता. एखादी व्यक्ती उच्चपदस्थ असताना त्याच्या मागे पुढे सगळेजण सलाम करण्यासाठी झुकत असतात. तो जणू काही स्वतःचा अनुभवच सांगत होता. मी बॉस असताना माझी अशी मजा होती की, मला आणायला एअरपोर्टवर कार येत असे. हॉटेलमध्ये आधीच बुकिंग झालेले असे. एखाद्या ठिकाणी लेक्चर द्यायला जायचे असेल तेथे नेण्यासाठी कार येत असे. रात्री खास डिनर असे. एक ना दोन अनेक गोष्टी…पण म्हणे जेव्हा मी त्या पोस्टवरुन रिटायर झालो, तेव्हा आता ना गाडी येते ना हॉटेलचे बुकिंग झालेले असते. सगळं काही माझं मलाच करायला लागते.

म्हणजे थोडक्यात काय तर तो जो काही सगळा रुबाब होता तो त्या पोस्टमुळे होता आणि आता ती जागा गेल्यावर तो मानमरातब देखील नाहीसा झाला. असा त्या व्हिडिओचा मतितार्थ होता.

आजकाल होतं काय की आपल्याला असे इंग्रजीतले डेमो देत केलेले व्हिडिओ असले की सगळं लगेच पटतं. पण याच जीवनशिक्षणाच्या महत्वाच्या गोष्टी आपल्याला आपल्या पारंपरिक कहाण्यांमधून पूर्वी मिळत असे.

हे जीवनशिक्षण देण्याचे काम घरातील वडीलधारे सहजगत्या, जाता जाता एखादी उद्बोधक कथा सांगून करत असत. सध्या श्रावण महिना सुरु आहे. आपल्या लोकवाङमयामध्ये विविध वारांच्या, चातुर्मासातील व्रतवैकल्याच्या अनेक कहाण्या आहेत.

मूल्यशिक्षण, जीवनशिक्षण पुढच्या पिढीला सहजपणे देण्यासाठी या कहाण्यांचा खूप मोठा वाटा आहे. आता मी वर जी व्हिडिओची गोष्ट सांगितली ना की, ज्याच्याकडे पैसा, त्याला म्हटले जाते बैसा, अशा आशयाची देखील एक कहाणी आहे.

ही कहाणी शुक्रवारची कहाणी म्हणून ओळखली जाते. त्याचा कथा भाग साधारणपणे असा आहे. एका गावात एक गरीब बाई आपल्या मुलाबाळांसह राहत असते. तिचा श्रीमंत भाऊ त्याच गावात असतो. एकदा तो गावजेवण घालतो. पण या बहिणीला बोलावत नाही.

बहीण विचार करते भाऊ विसरला असेल. त्याच्याकडे जायला आपल्याला बोलावणे कशाला हवे. म्हणून ती जेवायला जाते. भाऊ तिला पंगतीत बघतो आणि तिच्यावर चिडतो. तू अशी दरिद्री, इथे येण्याची हिंमतच कशी केलीस असे विचारतो. बहीण काहीच बोलत नाही. दुस-या दिवशी पण परत जेवायला जाते. गुपचुप जेवून येते. परत तिस-या दिवशी पण जाते. तेव्हा भाऊ संतापतो, हात धरुन बाहेर काढतो.

पुढे काही दिवसांनंतर त्या बहिणीची सांपत्तिक स्थिती सुधारते. ती भावाला आपल्याकडे जेवायला बोलावते. भाऊ ओशाळून म्हणतो, मी येईन. पण तू आधी आले पाहिजेस. बहीण येण्याचे कबूल करते. ती दागदागिने, उंची वस्त्रे घालून भावाकडे जाते. जेवणाची वेळ होते. पानात अन्न वाढले जाते. त्यावेळी बहीण अंगावरील एक एक दागिना काढून बाजूला ठेवते.

भावाला वाटतं उकडत असेल म्हणून असं करतेय. पुढे बहीण जेवणाचा एक एक घास एका एका दागिन्यावर ठेवते. न राहवून भाऊ विचारतो, तू हे काय करतेस. तेव्हा ती शांतपणे भावाला सांगते. माझे जेवण मी त्या गावजेवणाच्या वेळेसच जेवलेय. आज तू जिला जेवायला बोलावले आहेस तिला जेवण देतेय.

म्हणजेच आज तू लक्ष्मीच्या चकचकाटाला भुलून मला जेवायला बोलावले आहेस. मी तिलाच जेवण देतेय. त्या व्हिडिओचा देखील हाच आशय होता. त्यामुळे विस्मरणात गेलेला आपला उच्च वारसा पुन्हा एकदा उजळण्याची आणि आपल्या पुढच्या पिढीकडे सोपवण्याची वेळ आली आहे असे वाटते आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.