Corona Test : आता तुमचा स्मार्ट फोन करेल कोरोनाची चाचणी

एमपीसी न्यूज : गेल्याच आठवडय़ात जर्मनीच्या शास्त्रज्ञांनी एका स्मार्टफोनच्या अशा प्रोटोटाईपला तयार करण्यात यश मिळवले आहे की, ज्याच्या मदतीने रक्तातील विषाणूंचा शोध घेणे अत्यंत सुलभ होणार आहे. 

या स्मार्टफोनला चक्क मायक्रोस्कोप आणि डीएनए एंटिनाची सुविधाच देण्यात आलेली आहे, तर दुसऱ्या बाजूला गेल्या वर्षी मलेरियाच्या चाचणीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या मायक्रोनीडलचा शोध लावणाऱ्या अमेरिकेच्या राईस युनिव्हर्सिटीने नुकतीच एक स्मार्ट चिप बनवण्यात यश मिळवले असून या चिप, तिच्या बरोबर येणारे विशिष्ट ऍप आणि स्मार्टफोनच्या मदतीने अत्यंत पटकन कोरोनाचे अचूक निदान करणे शक्य होणार आहे.

जगात आजही अनेक देशांना त्यांच्या देशातील दुर्गम भागांमध्ये कोरोना चाचण्या करणे अवघड बनलेले आहे. अशावेळी हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. या चीपला ‘microfluidic’ असे नाव देण्यात आलेले आहे. एखाद्या नाण्याच्या आकाराची ही चिप आहे. कुठल्याही लॅब अथवा स्वॅब टेस्टिंगमध्ये जाण्याची गरज या तंत्रज्ञानामुळे उरणारच नाही असा दावा केला जातो.

एकदा एका टय़ूबच्या मदतीने या चिपमध्ये सॅम्पल टाकले की, या चिपमधील मॅग्नेट सिरमला इलेक्ट्रोकेमिकल सेन्सरपर्यंत पोचवते आणि त्यानंतर चिप स्मार्टफोनमधील ऍपला सिग्नल पाठवते आणि त्याद्वारे कोरोनाच्या चाचणीचा निकाल आपल्याला प्राप्त करता येतो. अवघ्या 55 मिनिटांचा वेळ या सर्व प्रक्रियेसाठी लागतो हे महत्त्वाचे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.