Nigdi : हेडगेवार भवन शेजारील मोकळ्या जागेतील अस्वच्छतेमुळे नागरिक ​त्रस्त

प्लॉटचा गैरवापर थांबवण्याची निगडी प्राधिकरण रेसिडन्स फोरमची मागणी

एमपीसी न्यूज- निगडी प्राधिकरण ​येथील हेडगेवार भवनच्या शेजारील मोकळ्या प्लॉटचा वापर पालिकेकडूनच अनधिकृतरित्या होत असल्याचे निदर्शनास आले असून या जागेवर कचऱ्याचा गाड्या, शौचालयाच्या फिरत्या गाड्या उभ्या करणे, लोखंड, भंगार, टायर अशा वस्तूंचा साठा करणे असे प्रकार चालू आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. निगडी प्राधिकारणातील नागरिक व नगरसेवकांनी निगडी प्राधिकरण रेसिडन्स फोरम NPRF या संस्थेच्या माध्यमातून आपला लढा अधिक तीव्र केला आहे. या जागेचा गैरवापर त्वरित थांबवावा अशी मागणी करण्यात आली आहे.

2013 सालापासून निगडी प्राधिकरण परिसरातील नागरिक या जागेच्या अनधिकृत वापराविरोधात लढा देत आहेत. सध्या या जागेवर कचऱ्याचा गाड्या, शौचालयाच्या फिरत्या गाड्याचे पार्किंग मोठ्या प्रमाणात केले जात आहे. या गाड्या स्वच्छ धुतल्या न गेल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. पावसाळ्यात हा प्रश्न आणखीनच बिकट होतो. त्याच बरोबर या मोकळ्या जागेवर लोखंड, भंगार, टायर अश्या वस्तूंचा साठा ठेवण्यात आला आहे. या वस्तूंमध्ये पाणी साचून मलेरिया, डेंग्यू यांसारख्या भयंकर आजारांचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. 2018 साली याच भागात डेंग्यूचे अनेक रुग्ण आढळून आले होते. टायरमध्ये पाणी साचल्यामुळेच या भागात डेंग्यूची लागण झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला.

त्याच जागेला लागून महानगरपालिकेचे टेनिस कोर्ट आहे येथे अनेक खेळाडू खेळण्यासाठी येत असतात मात्र त्यांनाही या दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. सदर जागा ही प्राधिकारणातील मध्यवर्ती जागा असून त्याभोवती रहिवासी बंगले, कॉलनी, शाळा, कॉलेज, आकुर्डी रेल्वेस्टेशन, विविध खेळांच्या सुविधा आहेत. असे असतानाही हा भाग अस्वच्छ ठेवण्यात आला आहे.

पालिकेच्या विकास आराखड्यामध्ये या जागेवर जिल्हा मध्यवर्ती केंद्र बांधण्याचे नियोजन आहे. म्हणजेच प्रशासकीय इमारती, शासकीय कार्यालये अथवा नागरिकांंसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे अपेक्षित असताना या जागेचा गैरवापर होऊ लागला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पालिकेने ठेकेदाराला कचरा वाहून नेण्यासाठी केलेल्या करारामध्ये सदर जागेवर गाड्या पार्किंग करण्यास मान्यता दिली आहे. म्हणजेच या जागेचा गैरवापर करण्यास महापालिकेने उघडपणे मान्यता दिली. हे करत असताना स्थानिक नगरसेवकांना मात्र अंधारातच ठेवण्यात आले आहे.

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून 5 जून रोजी सदर जागेच्या गैरवापराच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी याठिकाणी वृक्षारोपण केले आणि या लढ्याची माहिती देणारा फलक ​रोपाला लावण्यात आला. पावसाळा तोंडावर आला असताना पुन्हा त्याच समस्येला सामोरे जावे लागणार असल्याने निगडी प्राधिकारणातील नागरिक व नगरसेवकांनी निगडी प्राधिकरण रेसिडन्स फोरम NPRF या संस्थेच्या माध्यमातून आपला लढा अधिक तीव्र केला आहे.

त्याचाच परिणाम म्हणून दिनांक 12 जून रोजी ‘अ’ प्रभाग समितीच्या बैठकीत कचऱ्याच्या गाड्यांचा पार्किंगसाठी पर्यायी जागा देण्याबाबतचा ठराव संमत करण्यात आला. नागरिकांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मंगळवारी (दि. 18) आयुक्तांनी ​सदर जागे​वर प्रत्यक्ष जाऊन ​पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, माजी उपमहापौर शैलजा मोरे​,​​ नगरसदस्य अमित गावडे, राजू मिसाळ, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ अनिल रॉय, प्रभाग अ चे आरोग्य अधिकारी तसेच निगडी प्राधिकरण रेसिडन्स फोरमचे सदस्य सुशील ​सहानी​, चंद्रकांत कोठारी, सुशील मुथियान, राज्य ​माथाडी कामगार संघटना सदस्य अनुप मोरे, टेनिस प्रशिक्षक मनोज कुसाळकर आदी उपस्थित होते.

यावेळी स्थानिक नगरसेवकांनी चुकीच्या व गैरप्रकारच्या गोष्टी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्या. तसेच कचऱ्याचा गाड्यांचे पार्किंग तत्काळ हटवण्याची विनंती केली. त्यानंतर आयुक्तां​नी दोन पर्यायी जागांची पाहणी ​केली. ट्रान्सपोर्ट नगरमधील अविष्कार हॉटेलजवळील पालिकेच्या उद्यानाची जागा आणि ट्रान्सपोर्टनगर मधील पीएमपीएलचा निगडी डेपो अशा दोन जागांची पाहणी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केली.

त्याचप्रमाणे आरोग्य, स्थापत्य आणि संबंधित ठेकेदार यांनी एकत्र येऊन पर्यायी जागेची व्यवहार्यता तपासावी तसेच त्यासाठी किती खर्च लागेल याचा अंदाज काढावा अशी सूचना त्यांनी केली. या कामासाठी साधारणता 6 ते 8 महिन्यांचा कालावधी लागू शकतो तोपर्यंत हेडगेवार भावनांच्या शेजारील मोकळ्या जागेवरील टायर, भंगार तसेच इतर वस्तू त्वरित हटवण्यात येतील असे आश्वासन आयुक्तांनी नागरिकांना दिले.

याबाबत बोलताना NPRF सदस्य व आंदोलनाचे समन्वयक सुशील सहानी म्हणाले, ” आम्ही 2013 पासून लढा देतोय ​! ​पालिकेने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. या कचऱ्याच्या गाड्या त्वरित हटवून परिसर मोकळा करावा. ​पालिका त्वरित जागा मोकळी करणार असेल तर ​​सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आम्ही या जागेवर जॉगिंग ट्रॅक तयार करून देखभाल करू”​ ​

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.