NSE Shut Down : तांत्रिक बिघाडामुळे ‘नॅशनल स्टॉक एक्सचेंज’चं काम बंद

एमपीसी न्यूज – सेवा प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं ‘नॅशनल स्टॉक एक्स्चेंज’चं (एनएसई) काम ठप्प झालं आहे. ‘एनएसई’ला सेवा प्रदान करणाऱ्या दोन्ही दूरसंचार कंपन्यांच्या यंत्रणेत बिघाड झाल्यानं त्याचा परिणाम एनएसईच्या प्रणालीवर झाला आहे. त्यामुळे कामकाज थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एनएसईनं ट्विट करून दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचं (एनएसई) कामकाज सुरू असताना स्पॉट निफ्टी किंमत आणि बँक इंडेक्स अपडेट होणं अचानक बंद झालं. त्यानंतर 11 वाजून 40 मिनिटांनी कामकाज बंद करण्यात आलं. दोन्ही दूरसंचार सेवा प्रदात्यांच्या प्रणालीमध्ये काही समस्या निर्माण झाल्याची माहिती मिळाली आहे. ज्याचा परिणाम एनएसईच्या प्रणालीवरही झाल्याचे एनएसईनं म्हटलं आहे.

लवकरात लवकर सेवा पूर्ववत करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. या सर्व परिस्थितीत 11.40 वाजता सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत आणि प्रणाली पूर्ववत होताच पुन्हा सुरू करण्यात येईल, असं एनएसईने स्पष्ट केलं आहे. यापूर्वी जून 2020 मध्ये ‘एनएसई’ची सेवा ठप्प झाली होती. त्यावेळी बॅंक ऑप्शनच्या किंमती दिसत नव्हत्या तसेच, सप्टेंबर 2019 मध्ये देखील तांत्रिक बिघाडामुळे गुंतवणूकदारांना ऑर्डर टाकता येत नव्हती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.