Chinchwad : परिचारिकांनी बांधली कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांना राखी ; लोकमान्य हाॅस्पिटल मध्ये पार पडले अनोखे रक्षाबंधन

Nurses tied rakhi to corona patients; unique rakshabandhan took place at Lokmanya hospital.

एमपीसी न्यूज – कोरोना महामारीचे सर्व जगावर संकट पसरले आहे अशात सण साजरे करण्यावर अनेक बंधने आली आहेत. भाऊ बहिणीच्या नात्याला आणखी घट्ट करणाऱ्या रक्षाबंधन या सणापासून अनेक कोरोना रुग्णांना वंचित राहावे लागत आहे. मात्र, चिंचवडच्या लोकमान्य हाॅस्पिटल मध्ये परिचारिकांनी बांधली कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांना राखी बांधून अनोखं रक्षाबंधन साजरे केले आहे.

परिचारिकांनी कोरोना बाधीत रुग्णांना पीपीई किट घालून राख्या बांधल्या. तसेच, त्यांना दीर्घायुष्य चिंतून त्यांच्या आयुष्याची दोरी बळकट केली. त्यामुळे रुग्णांना आधार मिळाला असून त्यांच्या जगण्याच्या लढाईस बळ मिळाले आहे.

या अभिनव उपक्रमामुळे रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकीचे नाते सर्वश्रेष्ठ असल्याचा प्रत्यय सर्वांना आला आहे.

लोकमान्य हाॅस्पिटल मधील विलगीकरण कक्षात कोरोनाचे सर्व जाती धर्माचे शेकडो रुग्ण उपचार घेत आहेत. रक्षाबंधन च्या सणाला बहिण आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी आतुर असते मात्र, या रुग्णांना संसर्गजन्य आजारामुळे सर्वांपासून दूर राहावे लागत आहे यामुळे त्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे या पार्श्वभूमीवर लोकमान्य हॉस्पिटलमध्ये परिचारिकांनी केलेला उपक्रम स्तुत्य व कौतुकास्पद असून यामुळे रुग्णांना मानसिक आधार मिळाला आहे.

रक्षाबंधन निमित्त करण्यात आलेल्या या  उपक्रमाबद्दल रुग्णांनी समाधान व्यक्त केले असून परिचारिकांना धन्यवाद दिले आहेत. तसेच या उपक्रमामुळे आमची बहिणीची उणीव भरून निघाल्याचे भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

लोकमान्य हॉस्पिटलच्या वरिष्ठ परिचारिका पुजा महामुनी म्हणाल्या कोरोना रुग्णांचे  विलगीकरण करण्यात येत असल्यामुळे त्यांना एकटेपणाची भावना निर्माण होऊ शकते तसेच त्यांना मानसिक आधाराची गरज असते.

त्यामुळे रक्षाबंधनाच्या औचित्य साधून आम्ही हा सण हॉस्पिटलमध्ये साजरा करण्याचा निर्णय घेतला. याबाबत रुग्ण देखील समाधान व्यक्त करत असल्याचे ते म्हणाल्या.

या उपक्रमाबद्दल बोलताना लोकमान्य हॉस्पिटलचे डॉ. श्रीकृष्ण जोशी असे म्हणाले की, कोरोना या संसर्गजन्य महामारी मुळे कोरोनाबाधित रुग्णांबद्दल अस्पृश्यतेची भावना निर्माण झाली आहे आणि ती खोडून काढणे फार गरजेचे आहे.
या उपक्रमामुळे कोरोना रुग्णांना औषध, सेवा, सुश्रुषेबरोबरच बहिणीची माया व आशीर्वाद मिळाल्याने त्यांना जगण्याचे नवे बळ मिळाले आहे.
डॉ. श्रीकृष्ण जोशी पुढे म्हणाले, कोरोना बरा होऊ शकताे त्यासाठी आजाराचे वेळेवर निदान करून योग्य उपचार घेणे गरजेचे आहे. मात्र, नागरिकांनी घाबरून न जाता योग्य काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
डाॅ. जयंत श्रीखंडे यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यात विशेष मदत केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.