Ravet : पीसीसीओईआरमध्ये संशोधन प्रकल्पास पोषक वातावरण : ज्ञानेश्वर लांडगे

पीसीसीओईआरच्या पेटंटला मेक इन इंडिया अंतर्गत 50 लाखांचा प्रोत्साहन निधी  

एमपीसी न्यूज – सीमेवर लढणा-या भारतीय जवानांना शस्त्रांचा वापर करताना सुरक्षितता व गोपनीयता बाळगण्यासाठी मदत करणारी प्रणाली पीसीसीओईआरचे प्रा. डॉ. राहुल मापारी यांनी विकसित केली आहे. तसेच प्लास्टिकचा वापर बांधकाम क्षेत्रात करण्याच्या नाविण्यपूर्ण शोधाला मेक इन इंडिया प्रकल्पांतर्गत 50 लाख रुपयांचा ‘उद्योजक प्रोत्साहन निधी’ जाहीर झाला आहे.

पीसीसीओईआरमध्ये विद्यार्थ्यांबरोबरच प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच स्वच्छता कर्मचारीदेखील आपल्यातील संशोधनवृत्तीस विकसित करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टचे (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालयात संशोधन प्रकल्पास पोषक वातावरणामुळे हे शक्य झाले. त्याचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी केले.

पीसीसीओईआरचे प्रा. राहुल मापारी यांनी केलेल्या संशोधनात सीमेवर लढणा-या जवानांचे शस्त्र त्यांच्याच बोटांचे ठसे व आवाजाच्या सूचनांव्दारे नियंत्रित करता येतील. जर सीमेवर शत्रुपक्षाच्या जवानाने आपल्या जवानाचे शस्त्र हस्तगत केले तरी त्याचा वापर त्यांना करता येणार नाही. तसेच दुस-या संशोधनात बंदुकीतील शिल्लक गोळयांची संख्या जवानांना दर्शनी भागात दिसेल. अनेकदा बंदुकीचा वापर करताना त्यातील शिल्लक गोळयांचा अंदाज येत नाही. जर जवानांनी ही प्रणाली वापरली तर त्यांना त्यांच्या बंदुकीतील गोळयांची संख्या व मॅगझीन बदलण्याची वेळ दर्शनीभागात दिसेल. हे दोन्ही पेटंट वापरात आल्यास जवानांचा आत्मविश्वास वाढेल व ते अधिक सक्षमपणे कर्तव्य बजावतील. या पेटंटबाबत केंद्रीय संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी पुढील कार्यवाहीबाबत पाठपुरावा सुरु आहे.

याबाबत अधिक माहिती देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिष तिवारी यांनी सांगितले की, पीसीसीओईआरमध्ये संशोधन प्रकल्पाची सुरुवात जुलै 2016 मध्ये झाली. अवघ्या तीन वर्षात संशोधन क्षेत्रात 138 पेटंट व 247 तांत्रिक ग्रंथावरील हक्काची (कॉपीराईट) अधिकृत नोंदणी करण्यात आली आहे व त्याच बरोबर ‘विविध आंतरराष्ट्रीय नियतकालीकांमध्ये (इंटरनॅशनल जर्नल) 216 हुन अधिक शोध निबंध प्रकाशित झाले आहेत. यामध्ये महाविद्यालयाच्या शिक्षकांनी एकूण 41 पेटंट, विद्यार्थ्यांनी 68 पेटंट, तृतीय श्रेणी कर्मचा-यांचे 2 पेटंट, शिक्षकेत्तर कर्मचा-याचे 1 पेटंट व ग्रंथालय विभागाचे 1 पेटंट नोंदविण्यात आले आहे. स्वत: प्राचार्य डॉ. हरीष तिवारी यांचे 25 पेटंटची अधिकृत नोंदणी झाली आहे.

शोध व संशोधन विभाग प्रमुख प्रा. राहुल बावणे यांनी नोंदणीकृत पेटंटची माहिती देताना सांगितले की, विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी दैनंदिन जीवनातील येणा-या अडचणींचा सखोल अभ्यास करून त्यावर मात करण्यासाठी नविन प्रणालींचा विकास केला व त्यावरील पेटंट नोंदविले, यामध्ये विशेषकरून प्लास्टीकचा वापर बांधकाम क्षेत्रात करण्याच्या नाविण्यपुर्ण शोधाला मेक इन इंडिया प्रकल्पांतर्गत 50 लाख रुपयांचा ‘उद्योजक प्रोत्साहन निधी’ जाहीर झाला आहे.

या व्यतिरीक्त दैनंदिन वापरातील साहित्य पेन, कॅलक्युलेटर, स्टॅपलर, युजबॅग इत्यादीवरील नविन संशोधनाचे पेटंट नोंदविले आहे. तसेच नद्यांची स्वच्छता करणारे उपकरण, वाहनांचे प्रदुषण कमी करणारे उपकरण, ऊर्जेचा अपव्यय थांबविणारे उपकरण या पेटंटची नोंद आहे. त्याचबरोबर रस्ता व वाहन सुरक्षेवरील नाविण्यपूर्ण संशोधनावर अधिकृत पेटंटची नोंद केली आहे.  तसेच प्रथम वर्षात शिक्षण घेतानाच एकूण 60 विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे 66 पेटंटची नोंदणी करण्याची कामगिरी केली आहे.

महाविद्यालयाने आता एक पाऊल पुढे टाकत नोंदणीकृत पेटंटचे व्यावसायिकीकरण करण्याबाबत कामकाज सुरू केले आहे. याचा विद्यार्थ्यांना भरघोस आर्थिक लाभ मिळेल व त्यातून विद्यार्थ्यांच्या कलागुणाना व संशोधनवृत्तींना अधिक चालना मिळेल. यानिमित्त पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विश्‍वस्त भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरीष तिवारी यांनी पीसीसीओईआरचे शोध व संशोधन विभाग प्रमुख प्रा. राहुल बावणे व पेटंट नोंदणी केलेल्या सर्व प्राध्यापकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.