OBC Morcha News : शनिवारवाड्यावर ओबीसी आरक्षणासाठीचा मोर्चा पोलिसांनी अडवला

एमपीसी न्यूज : ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेसह विविध संघटनानी शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चाचे आयोजन केले होतो. त्यासाठी पोलीस प्रशासनाकडून रितसर परवानगी देखील मागितली होती, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली. तरीही परिषदेचे प्रमुख समीर भुजबळ यांनी गर्दी जमविल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

परवानगी नाकारलेली असताना देखील सकाळी 10 वाजताच्या सुमारास शनिवारवाड्याच्या पटांगणात शेकडो कार्यकर्ते ‘उठ ओबीसी जागा हो, आरक्षणाचा धागा हो’, ‘जय ज्योती जय संविधान’ यासह विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन जमा झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे सुपूत्र समीर भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्यासह राज्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते जमा होत घोषणाबाजी करू लागले.

घटनास्थळी पोलीस प्रशासन तैनात होत खबरदारीचा उपाय म्हणून समीर भुजबळ यांना ताब्यात घेतले. मोर्चा पुढे जाऊ देण्यास मनाई करत अडवून ठेवले. त्यामुळे संतप्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोर्चा काढण्याची मागणी करत प्रचंड घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. गर्दीमुळे शिवाजी रस्त्यावरील वाहतूक संथ गतीने सुरू होती.

समीर भुजबळ म्हणाले, अन्य कोणत्याही समाजाला आरक्षण देण्यास अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा विरोध नाही. मात्र, इतर समाजांना आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास त्याला विरोध करीत हे कारस्थान आम्ही हाणून पाडू. त्यामुळे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी राज्य सरकारने उच्च व सर्वोच्च न्यायालयात वकील नियुक्त करणे यासह आमच्या विविध मागण्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.