Mumbai News : सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयावर शासनाने मागवल्या हरकती आणि सूचना

एमपीसी न्यूज – सुपर मार्केट किंवा वॉक इन स्टोअरमध्ये कुलूपबंद कपाटातून वाईनची विक्री करण्याची संकल्पना राबविण्याबाबत राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. ही संकल्पना राबविण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने राज्यातील नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवल्या आहेत.

29 जून 2022 पर्यंत नागरिकांना हरकती आणि सूचना पाठवता येणार आहेत. आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, दुसरा मजला, जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई 400023 या पत्त्यावर टपालाद्वारे अथवा [email protected] या मेल आयडीवर हरकती आणि सूचना पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

27 जानेवारी 2022 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुपर मार्केट किंवा वॉक इन स्टोअरमध्ये कुलूपबंद करता येईल कपाटातून मद्यसेवन परवानाधारकास सीलबंद बाटल्यांमध्ये केवळ वाईनची विक्री करण्यास परवानगी देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार विशेष परवाने आणि अनुज्ञप्ती नियम, 1952 मध्ये सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 च्या कलम 143 मधील तरतुदीनुसार प्रारूप नियमांच्या मसुद्यावर नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. याबाबत 31 मार्च रोजी राजपत्र प्रसिद्ध झाले आहे. राजपत्र प्रसिद्ध झाल्यापासून 90 दिवसात म्हणजेच 29 जून पर्यंत नागरिकांना हरकती आणि सूचना पाठवता येणार आहेत.

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयावरून राज्यात एकच चर्चा रंगली. भाजपसह विविध संघटनांकडून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात वातावरण निर्माण झाले. राज्य सरकारचा हा निर्णय कसा चुकीचा हे अनेकांनी सांगितले. मात्र आता अधिकृतपणे हरकती आणि सूचना यांच्या माध्यमातून या निर्णयावर मत मांडता येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.