ODI Series Ind Vs Aus : ऑस्ट्रेलियाची भारतावर 66 धावांनी मात, मालिकेत 1-0 ने आघाडी

एमपीसी न्यूज – भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सिडनी येथे सुरू असलेल्या वन-डे क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 66 धावांनी मात केली आहे. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या 375 धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव 308 धावांत आटोपला. भारताकडून हार्दिक पांड्याने 90 तर शिखर धवनने 74 धावांची खेळी केली. याविजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 375 धावांचा पाठलाग करताना भारताकडून शिखर धवन आणि मयांक अग्रवाल यांनी पहिल्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी केली. हेजलवूडने अग्रवालला माघारी धाडत टीम इंडियाला पहिला धक्का दिला, त्याने 22 धावा केल्या.

यानंतर कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यरही ठराविक अंतराने माघारी परतले. टिम 4 बाद 101 अशा संकटात असताना शिखर धवन आणि हार्दिक पांड्या यांनी पाचव्या विकेटसाठी 129 धावांची भागीदारी केली.

त्यानंतर, शिखर धवन 74 धावांवर बाद झाला. हार्दिक पांड्याने फटकेबाजी करत सामन्यात रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतू, झॅम्पाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. पांड्याने 90 धावांची खेळी केली. यानंतर भारताच्या अखेरच्या फळीतल्या फलंदाजांनी निराशाच केली. ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू झॅम्पाने 4 तर हेजलवूडने 3 तर मिचेल स्टार्कने 1 बळी घेतला.

सुरूवातीला कर्णधार फिंचने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फिंच आणि स्टिव्ह स्मिथ यांची धडाकेबाज शतकं आणि त्यांना डेव्हिड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी फटकेबाजी करत दिलेली उत्तम साथ या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या वन-डे सामन्यात 374 धावांपर्यंत मजल मारली. फिंचने 114 तर स्मिथने 105 धावांची खेळी केली.

त्यानंतर फिंच आणि वॉर्नर या जोडगोळीने मैदानावर स्थिरावत पहिल्या विकेटसाठी 156 धावांची भागीदारी केली. वॉर्नरने 69 धावा करूंन बाद झाला.

याचदरम्यान, फिंचने आपलं शतक साजरं केलं. परंतू बुमराहच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात तो यष्टीरक्षक राहुलकडे झेल देऊन माघारी परतला. त्याने 114 धावांची खेळी केली. चौथ्या क्रमांकावर आलेल्या स्टॉयनिस भोपळाही न फोडता माघारी परतला.

यानंतर मॅक्सवेलने आपली जबाबदारी पूर्ण करत फटकेबाजीला सुरुवात करत ऑस्ट्रेलियाला स्मिथच्या साथीने त्रिशतकी धावसंख्या ओलांडून दिली.

शमीच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मॅक्सवेलही माघारी परतला. यानंतर लाबुशेनही फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात बाद झाला. मात्र यानंतर स्मिथने कॅरीच्या साथीने आपलं शतक झळकावत ऑस्ट्रेलियाला भक्कम धावसंख्या उभारुन दिली. मोहम्मद शमीच्या अखेरच्या षटकात स्मिथ बाद झाला. भारतीय संघाकडून मोहम्मद शमीने 3 तर बुमराह-सैनी आणि चहल यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.