ODI Series Ind vs Aus : भारताचा 51 धावांनी पराभव, ऑस्ट्रेलियाने मालिका 2-0 ने जिंकली

एमपीसी न्यूज – ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघावर 51 धावांनी मात केली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय मालिकेत 2-0 आघाडी घेत मालिका जिंकली. सिडनीच्या मैदानावर 390 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ 338 धावांपर्यंतच मजल मारु शकला.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 390 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून शिखर धवन आणि मयांक अग्रवाल जोडीने चांगली सुरुवात केली. परंतू अर्धशतकी भागीदारी केल्यानंतर दोन्ही फलंदाज माघारी परतले. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला. श्रेयस अय्यरला 38 धावा करून बाद झाला. यानंतर लोकेश राहुल आणि विराट कोहली यांची जोडी जमली. यादरम्यान विराटने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं.

दुसऱ्या बाजूने लोकेश राहुलही त्याला चांगली साथ देत होता. विराट 89 धावांची खेळी करुन बाद झाला. कोहली बाद झाल्यानंतर लोकेश राहुलनेही जबाबदारी स्विकारत पांड्याच्या जोडीने फटकेबाजीचा प्रयत्न केला. अर्धशतकी खेळी केल्यानंतर तो देखील झॅम्पाच्या गोलंदाजीवर 76 धावा काढून बाद झाला. त्यानंतर कोणीही मोठी खेळी करू शकले नाही. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने 3, जोश हेजलवूड आणि झॅम्पाने प्रत्येकी 2 तर हेन्रिकेज आणि मॅक्सवेल यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या सामन्याप्रमाणेच फटकेबाजी सुरुवात करत आपली अर्धशतकं पूर्ण केली. अखेरीस मोहम्मद शमीने कर्णधार फिंचला माघारी धाडत भारताला पहिलं यश मिळवून दिलं, त्याने 60 धावा केल्या. यानंतर ठराविक अंतराने डेव्हिड वॉर्नरही जाडेजाच्या गोलंदाजीवर चोरटी दुहेरी धाव घेत असताना श्रेयस अय्यरच्या अचूक फेकीमुळे धावबाद झाला. वॉर्नरने 77 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांसह 83 धावा केल्या.

त्यानंतर मैदानावर आलेल्या स्टिव्ह स्मिथने सामन्याची सूत्र आपल्या हाती घेत फटकेबाजीला सुरुवात केली. दोन विकेट घेतल्यानंतर आत्मविश्वास वाढलेल्या भारतीय संघाला स्मिथने पुन्हा एकदा बॅकफूटला ढकललं. मार्नस लाबुशेनसोबत स्मिथने तिसऱ्या विकेटसाठी 136 धावांची भागीदारी केली. भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल करत स्मिथने चौफेर फटकेबाजी केली. 64 चेंडूत 14 चौकार आणि 2 षटकारांच्या सहाय्याने स्मिथने 104 धावा केल्या. लाबुशेननेही आपलं अर्धशतकही पूर्ण केलं 70 धावा काढून तो माघारी परतला. नवदीप सैनीच्या अखेरच्या षटकात मॅक्सवेलनेही (63) आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यासह ऑस्ट्रेलियाने 390 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून सैनी, बुमराह आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी 1-1-1 बळी घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.