Pune : संभाजी ब्रिगेडने दिल्या शिक्षण आयुक्त कार्यालयात दारूच्या बाटल्या

एमपीसी न्यूज – सर्व शिक्षा अभियानातील ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ या पुस्तकात संभाजी महाराजांविषयी वादग्रस्त उल्लेख केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘संभाजी राजा हा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता’ असा वादग्रस्त उल्लेख केल्याचे समोर आले आहे. संभाजी ब्रिगेडने या पुस्तकावर आक्षेप घेतला आहे.

सर्व शिक्षा अभियानात ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ या पुस्तकाचा समावेश असून हे पुस्तक डॉ. शुभा साठे यांनी लिहिले आहे. पुस्तकाचे प्रकाशन नागपूरमधील लाखे प्रकाशनाने केले आहे. या पुस्तकातल्या लेखनाला आक्षेप घेत संभाजी ब्रिगेडने पुण्यात शिक्षण आयुक्त कार्यलयात दारूच्या बाटल्या देत आपला निषेध नोंदविला. त्याचबरोबर समर्थ श्री रामदास स्वामी या पुस्तकावर बंदी घालावी तसेच पुस्तकाचे प्रकाशक, लेखक डॉ. शुभा साठे आणि सबंधित अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करून सर्वांवर ‘राष्ट्रद्रोहाचा गुन्हा’ दाखल करावा अशी मागणी देखील संभाजी ब्रिगेडने केली आहे.

‘समर्थ श्री रामदास स्वामी’ या पुस्तकातील पान क्रमांक १८ वर संभाजी महाराजांविषयी उल्लेख आहे. ‘रायगडावरुन संभाजीराजांनी केलेल्या अनेक खऱ्या- खोट्या अत्याचारांच्या बातम्या समर्थांच्या कानावर येत होत्या. संभाजी राजा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता. स्वराज्याची ही अवहेलना पाहून समर्थांचे अंत:करण तिळतिळ तुटत होते. मनातला राम अखेरच्या कर्तव्याची टोचणी लावत होता. अखेर समर्थांनी संभाजीराजांना पत्र लिहिले’, असा उल्लेख या पुस्तकात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.