Pimpri: प्रशस्त दालने, स्वतंत्र स्वच्छतागृहासाठी कार्यालयाची तोडफोड सुरुच!

महापौरांपाठोपाठ आता उपमहापौरांनाही स्वतंत्र स्वच्छतागृह

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत पहिल्यांदाच सत्तेत आलेल्या भाजपच्या पदाधिका-यांचा प्रशस्त दालने, स्वतंत्र स्वच्छतागृहांचा मोह काही केल्या कमी होत नाही. तत्कालीन महापौरांनी आपल्या दालनाच्या बाजूला स्वतंत्र स्वच्छतागृह करुन घेतल्यानंतर आता वाढदिवसाच्या फलकांमुळे अगोदरच वादात सापडलेल्या विद्यमान उपमहापौरांच्या दालनाशेजारी देखील स्वतंत्र स्वच्छातागृहाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी कोणतीही प्रशासकीय, आर्थिक मंजूरी न घेता दालने तोडफीचा उद्योग केला जात आहे.

पिंपरी महापालिकेची चार मजली इमारत आहे. पालिकेच्या तीस-या मजल्यावर महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, विविध विषय समित्यांचे सभापती यांची प्रशस्त दालने आहेत. प्रत्येक मजल्यावर पुरुष आणि महिलांसाठी अशी दोन स्वच्छतागृह आहे. तीस-या मजल्यावर पदाधिका-यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आहेत. असे असतानाही तत्कालीन महापौर नितीन काळजे यांनी दालनाच्या बाजूला स्वतंत्र स्वच्छतागृह बांधून घेतले होते.

आता उपमहापौर सचिन चिंचवडे यांच्यासाठी देखील स्वतंत्र स्वच्छतागृह बांधले जाणार आहे. त्यांच्या दालनाच्या बाजूला स्वच्छतागृहाचे काम सुरु आहे. दोन पाऊलावरच स्वच्छतागृह असताना स्वतंत्र स्वच्छतागृहावर पैशांची उधळपट्टी कशासाठी केली जात आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. वाढदिवसानिमित्त लावलेल्या फलकांमुळेच अगोदरच वादात सापडलेले उपमहापौर चिंचवडे यांच्या अडचणीत स्वच्छतागृहामुळे आणखीन भर पडण्याची शक्यता आहे.

याबाबत बोलताना उपअभियंता लक्ष्मीकांत कोल्हे म्हणाले, ‘महापालिकेत अंतर्गत काम असल्यामुळे स्वच्छतागृहाच्या कामासाठी परवनागीची आवश्यकता नाही. गेल्या अनेक दिवसांपासून उपमहापौरांची स्वतंत्र स्वच्छतागृह बांधून देण्याची मागणी होती. त्यानुसार स्वच्छतागृहाचे काम सुरु आहे’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.