Pimpri News : अधिका-यांनो, तांत्रिक कारणे देत नागरिकांना वेठीस धरू नका –  महेश लांडगे

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड शहरातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांनी चालढकल करु नये.प्रशासक काळात रखडलेली कामे तात्काळ मार्गी लावावी.तसेच, तांत्रिक कारणे देत नागरिकांना वेठीस धरू नये.तसेच आंद्रा, भामाआसखेड प्रकल्पाचे पाणी शहराला मिळण्याबाबत प्रशासनाची सुरू असलेली चालढकल खपवून घेतली जाणार नाही, अशा शब्दांत भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना खडसावले.

शहरातील रस्ते, पाणी आणि कचरासह विविध प्रकल्पांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. यासाठी भाजपा शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी ऑटो क्लस्टर येथे संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, सहशहर अभियंता मकरंद निकम, संजय कुलकर्णी, श्रीकांत सवणे आदी उपस्थित होते. आंद्रा, भामा आसखेड प्रकल्पाचे पाणी सप्टेंबरअखेर पिंपरी – चिंचवडला मिळेल, असा दुजोरा महापालिका अधिकाऱ्यांनी दिला.तसेच, देहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा कचरा मोशी कचरा डेपो येथे टाकण्यात येणार आहे. त्याला स्थानिक नागरिकांसह लोकप्रतिनिधींनी विरोध केला आहे. तेथील नागरिकांशी चर्चा करुन जोपर्यंत कॅन्टोन्मेंटचा प्रकल्प तयार होत नाही.तोपर्यंत कचरा टाकण्याबाबत विनंती करावी.त्यासाठी देहुरोड कॅन्टोन्मेंटचे मुख्याधिकारी यांच्यासोबत बैठक लावावी, अशी सूचना आमदार लांडगे यांनी केली.

तसेच, स्पाईन रोड त्रिवेणीनगर येथील रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी बाधीत नागरिकांचे पुनर्वसन प्रक्रिया अत्यंत जलदगतीने होण्यासाठी कमीत कमी जागा मालकीचे पुरावे घेवून त्यांना तातडीने जागा उपलब्ध करुन द्यावी.उर्वरित बाधीत नागरिकांची बाजू समजून घेण्यासाठी कॅम्प लावावा.त्रिवेणीनगर ते तळवडे मुख्य रस्ता 24 मीटर असून, काही ठिकाणी 24 मीटर रस्त्याचे भूसंपादन होत नसल्याने रस्ता रुंदीकरणात अडचणी येत आहेत. त्यामुळे तातडीने कार्यवाही करावी, अशी सूचना आमदार लांडगे यांनी केली.

शहरातील गोवंश संवर्धन आणि उपचार केंद्राबाबत प्रशासनाकडे मागणी केली आहे. त्यासाठी चिखली ते चऱ्होली दरम्यान ब्लू लाईनमध्ये महापालिकेच्या ताब्यात आलेले आरक्षणामध्ये गोशाळा विकसित करता येईल का? याबाबत पडताळणी करावी. भोसरी थोरल्या पादूका चौकातील संतशिल्प व म्युरल्सचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. भोसरीत लहान मुलांचे रुग्णालय आणि ओपीडी संदर्भातील नियोजन तात्काळ करावे, आदी सूचना आमदार लांडगे यांनी केल्या आहेत. भोसरीतील कुस्ती संकुल आणि कबड्डी संकुलमधील खेळाडुंना राहण्याची सोय व्हावी. याकरिता 120 बेड क्षमतेचे वसतीगृहाचे काम लवकरात लवकर सुरू करावे. स्ट्रॉम वॉटर लाईनची अपूर्ण कामे पूर्ण करावी आदी सूचनाही आमदार लांडगे यांनी दिल्या आहेत.

यमुनानगर, निगडी भागातील अनेक घरांवर रेडझोनची मार्किंग दाखवली जात आहे. ती दुरूस्त करुन घेण्यासंदर्भात बैठक लावावी. तसेच, संरक्षण विभागाकडून रेडझोनची हद्द निश्चित करणे, तसेच, आंद्रा, भामा आसखेड प्रकल्प, भूसंपादनाबाबत प्रलंबित प्रकरणे, क्रिकेट स्टेडिअम, सफारी पार्क, मोशी आणि पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी भूसंपादन प्रक्रिया गतीमान करण्यासाठी तसेच चिखली हॉस्पिटल जागेबाबत संबंधित विभागांशी तातडीने बैठक घ्यावी. कॅनबे चौक ते भक्ती-शक्ती चौक हा मार्ग रेडझोन हद्दीतून नव्याने विकसित करण्यासाठी अहवाल सादर करावा. विकासकामांत हयगय नको, अशी ताकीद आमदार  लांडगे यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे.

दहीहंडी, गणेशोत्सवासाठी एक खिडकी सुविधा

कोरोना महामारीमुळे दोन वर्षे सण- उत्सव साजरे करता आले नाही. यावर्षी दहीहंडी आणि गणेशोत्सव सार्वजनिकपणे साजरा होत आहे. त्यामुळे मंडळांसाठी ना- हरकत परवाना देण्यासाठी सुलभ प्रक्रिया ठेवावी. त्यासाठी एक खिडकी सुविधा उपलब्ध करुन द्यावी. पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर द्यावा.  यासह शहरातील सोसायट्यांमध्ये अनेक ठिकाणी एसटीपी प्रकल्प बंद अवस्थेत आहेत. याबाबत सर्व्हेक्षण करुन संबंधित बिल्डरवर दंडात्मक करावी. त्याचप्रमाणे एसटीपी जनरेटर, कचरा प्लॅन्ट, सोलर सिस्टीम याबाबत दर्जेदार यंत्रणा बसवणेसाठी बांधकाम व्यावसायिकांना सूचना द्याव्या.2016 च्या अगोदर बंधनकारक नव्हते. त्यामुळे त्या सोसायटीतील कचरा उचलण्यासंदर्भात आदेश देणे. सोसायटीधारकांसाठी 100 टक्के पार्किंग उपलब्ध व्हावी. याबाबत नियम करुन नगरविकास विभागाला प्रस्ताव पाठवावा. पर्यावरण संवर्धनाला चालना द्यावी, अशा सूचनाही आमदार लांडगे यांनी केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.