Pimpri : पालिका 20 सप्टेंबरपर्यंतच स्वीकारणार ओला कचरा

 20 सप्टेंबरनंतर  दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 100 किलोंपेक्षा जास्त ओला कचरा करणार्‍या अनेक हौसिंग  सोसायट्यांनी ओला कच-याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था अद्यापही केली नाही. त्यामुळे पालिकेने ओला कचरा स्वीकारण्याची मुदत 20 सप्टेंबर 2018 पर्यंत वाढविली. त्यानंतर ओला कचरा स्वीकारण्यात येणार नसून ओला कच-याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था न करणा-या संस्थावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. 

घनकचरा व्यवस्थापन 2016 मधील तरतुदीनुसार ओला व सुका कचरा वेगवेगळा करणे कायदेशीर बंधनकारक आहे. निर्माण झालेल्या ओला कचर्‍यावर प्रक्रिया करून त्यापासून खत निर्मिती करून तो जिरवावा, असे बंधन महापालिकेने घातले आहे. हौसिंग सोसायट्यांबरोबरच हॉटेल्स, मंगल कार्यालये, खानावळ, वसतिगृह, उपाहारगृह, शाळा, महाविद्यालये, भाजी मंडई व कृषी उत्पन्न बाजार समिती यांना ओला कचरा जिरविण्याची व्यवस्था सोसायटीला करणे बंधनकारक केले होते.

दररोज 100  किलो ओला कचरा निर्माण होणार्‍या हौसिंग सोसायट्या व इतर आस्थापनांकडून 1 एप्रिलपासून तो कचरा स्वीकारला जात नव्हता. पालिकेने या संदर्भात संबंधित सोसायट्या व आस्थापनांनी खत निर्मिती प्रकल्पाची व्यवस्था करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देखील दिली होती. परंतु, सोसाट्यांनी ओला कच-याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था केली नसल्याचे सांगत भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती.

त्यानंतर अद्यापर्यंतही अनेक सोसायट्यांनी ओला कच-याचा बंदोबस्त लावण्याची व्यवस्था केली नाही. त्यामुळे महापालिकेने पुन्हा एकदा ओला कचरा स्वीकारण्यास 20 सप्टेंबर 2018 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर ओला कचरा स्वीकारण्यात येणार नसून ओला कच-याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था न करणा-या संस्थावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.