Electric two-wheeler : ओला चा जगातील सर्वात मोठ्या ईलेक्ट्रिक टू-व्‍हीलर कारखाना भारतात

एमपीसी न्यूज : सोमवारी जगातील सर्वात मोठ्या ईलेक्ट्रिक टू-व्‍हीलर मॅन्‍युफॅक्‍चरिंग कारखान्याची घोषणा ऑनलाइन कॅब बूकिंग सेवा पुरवणाऱ्या ओलाने (Ola) केली. याला ‘ओला फ्यूचरफॅक्टरी’ असे नाव देण्यात आले आहे. वर्षाला एक कोटी ईलेक्ट्रिक स्कूटर यामध्ये तयार होतील.

हा कारखाना तामिळनाडुच्या कृष्‍णागिरी जिल्ह्यात ५०० एकर जागेत उभा राहणार असून यात दर दोन सेकंदाला एक स्‍कूटर तयार होईल, अशी माहिती कंपनीचे चेअरमन आणि ग्रुप सीईओ भाविश अग्रवाल यांनी दिली. १० हजार जणांना या कारखान्याद्वारे थेट रोजगार उपलब्ध होईल, असेही अग्रवाल म्हणाले. १ जून २०२१ मध्येच कारखान्याचा पहिला टप्पा सुरू होईल, पहिल्या टप्प्यात वर्षाला २० लाख प्रोडक्शनची क्षमता असेल, असे अग्रवाल यांनी सांगितले.

१० प्रोडक्‍शन लाइन या कारखान्यात असतील आणि सर्व लाइनवर पूर्ण क्षमतेने काम होईल. ३००० रोबोटसह हा सर्वात आधुनिक टू-व्हीलर कारखाना असेल, बॅटरीपासून इतर सर्व उपकरणं एकाच ठिकाणी भेटतील, असे अग्रवाल यांनी नमूद केले. आपल्या ट्विटर अकाउंटवरुन भाविश अग्रवाल यांनी कारखान्याचे काही फोटो आणि व्हिडिओही शेअर केले आहेत.

ओलाने भारतात लवकरच इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वीच केली होती. नेदरलँड्सची कंपनी Etergo BV चे ईलेक्ट्रिक स्कूटरसाठी ओलाने अधिग्रहण केले असून ही कंपनी ओला इलेक्ट्रिक स्कूटर बनवण्यासाठी मदत करणार आहे.

कमी किंमतीत जास्त मायलेज देणाऱ्या स्कूटर बनवण्यावर ओलाचा भर असणार आहे. त्यात Etergo BV ने एकदा चार्ज केल्यानंतर २४० किलोमीटरपर्यंतचे अतंर कापू शकणारी स्कूटर बनवल्यामुळे भारतातही कमी किंमतीत शानदार मायलेज देणारी स्कूटर लाँच करण्याचा ओलाचा प्रयत्न असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.