_MPC_DIR_MPU_III

Old Ornaments: अलंकारांची ही अनोखी, झगमगती दुनिया

Old Ornaments: This unique, glowing world of ornaments वाईचे सरदार श्रीमंत कृष्णराव रास्ते व त्यांच्या सौभाग्यवती यांचा सुमारे १०५ वर्षांपूर्वीचा फोटो व्हायरल झाला आहे.

एमपीसी न्यूज- असं म्हणतात की स्त्रिया या दागिन्यांच्या शौकिन असतात. स्वत:च्या अंगावर कितीही दागिने असले तरी समोरच्या स्त्रीच्या अंगावरील दागिने बघून त्या नेहमीच तुलना करतात. मात्र पुरुष नेहमी सोन्याकडे गुंतवणूक म्हणून बघत असतो. सध्या तर दररोज सोन्याचे भाव वेगवेगळी उंची गाठत आहेत. दहा ग्रॅम सोन्याचे भाव साधारणपणे पंचावन्न हजारच्या आसपास पोचले आहेत. अशा वेळी सध्या तरी सोन्याच्या खरेदीचा विचार बाजूला ठेवावा लागत आहे.

पण एकेकाळी स्त्रीच्या अंगावर ती दागिने घातल्यावर वाकेल, एवढे दागिने असतात असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. नाहीतर आपण गर्वाने म्हणतोच, की एकेकाळी भारत ही सुवर्णभूमी होती. येथे सोन्याचा धूर निघत असे.

गंमतीची गोष्ट जरी सोडून दिली तरी पूर्वीच्या काळी नेहमीच्या वापरात स्त्री किती दागिने घालत असे याचा एक फोटो सध्या महाराष्ट्र राज्य सोनार कारागिर संघटनेच्या वतीने व्हायरल होत आहे.

_MPC_DIR_MPU_II

वाईचे सरदार श्रीमंत कृष्णराव रास्ते व त्यांच्या सौभाग्यवती यांचा सुमारे १०५ वर्षांपूर्वीचा फोटो व्हायरल झाला आहे. यात सरदार रास्ते यांच्या अंगावर फक्त दोन दागिने दिसत आहेत. एक म्हणजे कानातली भिकबाळी आणि दुसरी बोटातली हि-याची अंगठी. पण त्यांच्या पत्नीच्या अंगावर तब्बल बावीस दागिने आहेत.

यात डोक्यावरील बिजवरा, बिंदी. कानातील काप, भोकरं आणि कुडुक आहेत. तसेच गळ्यातील तन्मणी, तारामणी, चिंचपेटी, पीत, सरी, पुतळ्यांची गाठलं, चंद्रहार हे दागिने आहेत. दंडात भोव-याची चटईची वाकी आहे. कंबरेत कमरपट्टा आहे. हातात पाटल्या, गाठे, बिलवर बांगड्या, मोत्यांचे जवे आणि बोटात अंगठी आहे.

पायात वाळे, तोडे आणि तोरड्या आहेत. यातील पायातील दागिने हे चांदीचे आहेत. मात्र अंगावरील इतर दागिने सोन्याचे किंवा काही दागिने मोत्यांचे आहेत. यातील सध्या आपल्या वापरात फार थोडेच असतील. पण त्याकाळची कल्पना येण्यासाठी हे चित्र खूप बोलके आहे.

तेव्हाचे दागिने आणि आत्ताचे दागिने यात कालपरत्वे बराच फरक पडला असला तरी भारतीय स्त्रियांची सोन्याची हौस आजही कायम आहे हेच खरे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1