BNR-HDR-TOP-Mobile

America : ऑलिम्पिक नॅशनल पार्क : धबधब्यांचे, सरोवरांचे, हिमशिखरांचे शेकडो ट्रेल्स व उत्तमोत्तम समुद्रकिनारे..

INA_BLW_TITLE
 
America- Travelogue – (श्रीराम कुंटे – भाग 2) 
 
एमपीसी न्यूज – कान्हा, कॉर्बेट यांसारखे काही सन्माननीय अपवाद सोडले तर आपल्याकडील राष्ट्रीय अभयारण्यात फिरायचं म्हणल्यावर आपल्या अंगावर काटाच येतो. ती टुरिस्टांची गर्दी, अंगावर येणारे गाईड, शहरापेक्षा जास्त गोंगाट, जंगलाचा अनुभव ओरबाडायला निघालेले पर्यटक आणि दयनीय अवस्थेतलं वन्यजीवन आपल्याला विषण्ण करतं. अमेरिकेत मात्र नॅशनल पार्क याच्या अगदी उलट अनुभव देतात. अतिभव्य आकार, नीरव शांतता, वन्य जीव हाच केंद्रबिंदू मानून केलेली आखणी आणि अत्युत्कृष्ट स्वयं-मार्गदर्शनाची व्यवस्था(हो, इथे गाईड हा प्रकारच अस्तित्वातच नाही) हे इथल्या प्रत्येक पार्कचं वैशिष्ट्य असतं. 
 
आम्ही ज्या ऑलिम्पिक नॅशनल पार्कमध्ये फिरलो ते साधारण ३७०० चौ. किमी आहे(पिंपरी-चिंचवड पालिकेचा आकार सुमारे १८० चौ. किमी आहे म्हणजे बघा) आणि तरीही आकारमानात या पार्कचा अमेरिकेत १३वा क्रमांक आहे. पार्कमध्ये वर्षाला साधारण १५० इंच पाऊस पडतो त्यामुळे सदाहरित वर्षावने तसेच शेवाळवने आहेत, २०० फुटांहून उंच हजारो स्प्रूस आणि सेडार महावृक्ष आहेत. धबधब्यांचे, सरोवरांचे, हिमशिखरांचे शेकडो ट्रेल्स आहेत आणि उत्तमोत्तम समुद्रकिनारे आहेत पण हे सगळं याची देही याची डोळा अनुभवायला हवं. आम्ही हे मनःपूर्वक अनुभवू शकलो कारण आम्ही हिवाळा आणि उन्हाळा यांच्या सीमेवरील शोल्डर सिझन मध्ये पार्कमध्ये आल्याने अगदीच तुरळक पर्यटक होते. इतके तुरळक की जणू आम्हीच या विस्तीर्ण पार्कचे मालक होतो.  
 
अमेरिकेतल्या सगळ्याच नॅशनल पार्क्स प्रमाणे या पार्कमध्येही वन्यजीवन आणि नैसर्गिक संपत्ती हा विकासाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे त्यांना अजिबात धक्का न लावता त्यांच्या बरोबरीने मानवी  सहजीवन फुलले आहे. इथली अर्थव्यवस्था जंगलातल्या लाकडाचा अतिशय नियंत्रित वापर आणि वर्षाला येणारे साधारण ३० लाख पर्यटक यांवर अवलंबून आहे.  इथली अजून एक गम्मत म्हणजे पार्कच्या बाहेर विशिष्ट ठिकाणी इथल्या मूलनिवासी इंडियन लोकांसाठी(इंडियन म्हणजे भारतीय नव्हे तर नेटिव्ह इंडियन्स. आता रेड इंडियन्स असं म्हणणं वर्णद्वेषी मानलं जातं) अमेरिकन सरकारने जागा राखीव ठेवल्या आहेत. या जागा इतर अमेरिकन खरेदी करू शकत नाहीत आणि या जागेवर टॅक्सही नाहीत. त्यामुळे या हुशार इंडियन्सनी या जागांमध्ये कॅसिनो काढलेत.  अमेरिकेच्या हवेतच व्यापार आहे म्हणतात ते खरं आहे.  
 
या ट्रीपमध्ये एक असा अनुभव आला. पार्कमध्ये फिरत असताना एका ठिकाणी रस्त्याचं काम चालू होतं म्हणून साध्या रस्त्यावर काम करणाऱ्या  कामगाराने सर्व वाहतूक रोखून ठेवली होती. आम्हीही रांगेत उभे असताना फॉरेस्ट रेंजरची कार तिथे आली. फॉरेस्ट रेंजर हा तिथल्या पार्कचा सर्वेसर्वा. आपल्याइकडचा फॉरेस्ट ऑफिसर समजा ना. त्याने आपली कार पुढे दामटायचा प्रयत्न केला तेव्हा त्या कामगाराने शांतपणे त्याला कार मागे घ्यायला लावली आणि अजून आश्चर्य म्हणजे फॉरेस्ट रेंजरनेही मी कोण आहे तुला माहीत नाही का?? छापाची उत्तरं न देता मुकाट्याने आपली कार रांगेत उभी केली. ही अशी उदाहरणं पाहिली म्हणजे ओबामांच्या बायकोला ट्रॅफिक पोलिसाने दंड कसा केला किंवा बिल क्लिंटनच्या मुलीला पोलिसाने दारू पिऊन गाडी चालवताना कसं काय पकडलं या प्रश्नांची उत्तरं मिळतात.     
 
या ट्रिपबद्दल आवर्जून सांगण्यासारख्या दोन गोष्टी म्हणजे सिएटल पासून ऑलिम्पिक नॅशनल पार्क आणि परत हा सुमारे १२०० किमी चा प्रवास आम्ही सिएटल एअरपोर्टपासूनच भाड्याने कार घेऊन केला. अतिशय सहजपणे उत्तम स्थितीतली कार भाड्याने घेता येते आणि भारतीय ड्रायविंग लायसन्सवर ती ६ महिन्यांपर्यंत चालवता येते. उत्तम रस्ते, व्यवस्थित खुणा आणि गुगल मॅप्समुळे तुम्ही चुकायचं ठरवलंत तरीही ते शक्य होत नाही. हल्ली आपण सगळे डोळस पर्यटन करायला लागलो आहोत. अशा पर्यटनात नुसतीच प्रेक्षणीय स्थळं न बघता ज्या भागात आपण जातो तिथली स्थानिक संस्कृती, आणि जीवनमान जवळून बघणं अपेक्षित असतं. म्हणूनच आम्ही जेवण्यासाठी स्थानिक छोटी छोटी रेस्टॉरंट्स आणि राहण्यासाठी एकही ठिकाणी हॉटेल्स न घेता स्थानिक माणसांची घरं बुक केली होती. स्थानिकांसारखं राहणं आणि खाणं यांमुळे हा सर्व प्रवास नितांत सुंदर असा अविस्मरणीय अनुभव ठरला. 
 
आता सिएटलपासून आम्ही निघालो आहोत ते अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी सी, जगाची आर्थिक आणि सांस्कृतिक राजधानी न्यू यॉर्क आणि अमेरिकन स्वातंत्र्यलढ्याची ठिणगी पेटवणारं बोस्टन येथे.  लवकरच तिथले अनुभव घेऊन येतोच तुमच्या भेटीला. 

"harin"
 
"jalashay"
HB_POST_END_FTR-A4

.