Omicron News: 6 रुग्णांपैकी 5 रुग्ण लक्षणेविरहित; पॅनिक होऊ नका; आयुक्तांचे शहरवासीयांना आवाहन

एमपीसी न्यूज – कोरोनाचा नवीन विषाणू असलेल्या ‘ओमायक्रॉन’चा संसर्ग  झालेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील 6 रुग्णांपैकी 1 रुग्णामध्ये सौम्य लक्षणे आहेत. तर, उर्वरित 5 रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. महापालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. नागरिकांनी पॅनिक होऊ नये.  कोरोना प्रतिबंधात्मक लस, मास्क आणि सुरक्षित अंतर या त्रिसुत्रीचे पालन करावे, असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी शहरवासीयांना केले.

परदेशातून शहरात आलेल्या 3 आणि त्यांच्या संपर्कातील अशा 6 जणांना  ‘ओमायक्रॉन’चा संसर्ग झाला आहे. एकाचदिवशी 6 रुग्णांना संसर्ग झाल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर महापालिका प्रशासनाने आज (सोमवारी) पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. महापौर उषा ढोरे, उपमहापौर हिरानानी घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे उपस्थित होते.

आयुक्त पाटील म्हणाले, परदेशातून शहरात येणा-या प्रत्येक नागरिकांची चाचणी केली जात आहे. होम क्वारंटाईन केले जाते. ‘ओमायक्रॉन’चा संसर्ग  झालेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील 6 रुग्णांपैकी 1 रुग्णामध्ये सौम्य लक्षणे आहेत. 5 जणांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. त्यांच्यावर जिजातामा रुग्णालयात उपचार सुरु असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. जुन्याच्या उपचार पद्धतीनुसार त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. परदेशातून शहरात 138 नागरिक आले आहेत. त्यातील 86 नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 7 जण आणि त्यांच्या संपर्कातील 9 जण पॉझिटीव्ह आले आहेत. तर, 70 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. विमानतळ, खासगी प्रयोगशाळेत 19 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आहेत. सर्वजण होम क्वारंटाईन आहेत. 16 जण महापालिका क्षेत्राबाहेरील आहेत.  ‘ओमायक्रॉन’ हा नवीन व्हेरिएंट आहे का नाही हे  तपासण्यासाठी 10 जणांच्या घशातील द्रावाचे नमुने जिनोम सिकव्हेंसिंग करिता पुणे ‘एनआयव्ही’ येथे पाठविण्यात आले आहेत. त्यांच्या रिपोर्टची प्रतिक्षा आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णापासून किती जणांना लागण होत आहे हे स्पष्ट झाले नाही. त्यामुळे तिस-या लाटेला सुरुवात झाली आहे असे म्हणता येणार नाही असे आयुक्त पाटील म्हणाले.परदेशातून शहरात येणा-या लोकांबाबत चौकस राहिलो. तर, ओमायक्रॉनचा प्रसार रोखता येईल. कोरोना प्रतिबंधात्मक लस, मास्क आणि सुरक्षित अंतराचे पालन करावे. महापालिका सज्ज आहे. 102 बेड असलेले नवीन भोसरी रुग्णालय ओमायक्रॉनच्या रुग्णांसाठी राखीव ठेवले आहे. नवीन जिजामाता रुग्णालय लहान मुलांसाठी राखीव आहे. तर, थेरगाव आणि आकुर्डी रुग्णालय कोरोनाच्या रुग्णांसाठी असणार आहे. रुग्ण वाढल्यास जम्बो कोविड केअर सेंटर, अॅटो क्लस्टर सेंटर सुरु करण्यात येईल. तर, वायसीएम रुग्णालय नॉन कोविड ठेवण्यात येणार असल्याचे आयुक्त पाटील यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.