Pimpri News: ‘चाईल्ड हेल्पलाईन’वर ! ‘शाळा कधी सुरु होणार, विविध औषधे, आहार कसा असावा’ याबाबत विद्यार्थ्यांचे प्रश्न

'चाईल्ड हेल्पलाईन'वर मुले विचारताहेत शाळा कधी सुरु होणार

एमपीसी न्यूज – शाळा कधी सुरु होणार ? आहार कसा असावा ? आम्ही हे औषध घेऊ का ? कोरोनापासून बचाव करण्यासाठी काय काळजी घ्यावी ? असे प्रश्न शहरातील मुलांकडून महापालिकेने सुरु केलेल्या ‘चाईल्ड हेल्पलाईन’वर विचारण्यात येत आहेत. 5 जुलैपासून असे 124 कॉल आले. त्यामध्ये चिंचवड आणि थेरगाव भागातील मुलांनी जास्त प्रश्न विचारले.

कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेत लहान मुलांना जास्त धोका असल्याचे सांगण्यात येते. त्यापार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने लहान मुलांसाठी चाईल्ड हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. शहरातील लहान मुलांना कोरोनाबाबत सविस्तर माहिती मिळावी, त्यांच्या मनातील कोरोनाबाबतची भीती दूर व्हावी, या उद्देशाने लहान मुलांकरीता शालेय विद्यार्थ्यांमार्फत संचालन होणारी चाईल्ड हेल्पलाईन 5 जुलै पासून सुरु करण्यात आली आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून लहान मुलांच्या कोरोना विषयक शंकांचे निरसन होण्यास मदत होत आहे. निगडीतील अस्तित्व मॉल येथील स्मार्ट सिटीच्या कंट्रोल अ‍ॅण्ड कमांड सेंटरमधून हेल्पलाईनचे काम चालते.

हेल्पलाईनवर मुलांचे आलेले फोन स्वीकारुन मराठी आणि इंग्रजी या भाषेतून उत्तरे दिली जातात. त्यासाठी दररोज दोन मुले असतात. महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी आरोग्यविषयक प्रश्नांची उत्तरे देतात. सोमवार ते शनिवार हेल्पलाईन चालू असते. सकाळी 11 ते 1 या वेळेत कॉल स्वीकारले जातात. रविवारी हेल्पलाइनचे कामकाज बंद असते.

कोरोना विषाणू आल्यापासून शाळा बंद आहेत. ऑनलाइन शिक्षण सुरु आहे. त्यामुळे शाळा कधी सुरु होणार याबाबत मुलांना जास्त उत्कंठा आहे. महापालिकेच्या हेल्पलाइनवर देखील शाळा कधी सुरु होणार याबाबत मुलांकडून विचारणा करण्यात आली.

”15 जुलैच्या अगोदर शाळा कधी सुरु होणार याबाबत मुलांकडून जास्त विचारणा करण्यात आली. त्याबाबत जास्त प्रश्न विचारले. मुलांना शाळा कधी सुरु होणार याची जास्त उत्कंठा होती. आहार कसा असावा, औषधांचे नाव सांगून आम्ही हे औषध घेऊ का, कोरोनापासून बचाव करण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे असे विविध प्रश्न मुलांकडून विचारले जात होते”, असे चाईल्ड हेल्पलाईनचे समन्वयक, उपअभियंता विजय भोजने यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना सांगितले.

”चाईल्ड हेल्पलाईनच्या वॉर रुममध्ये उपस्थित असलेले डॉक्टर मुलांच्या वैद्यकीयबाबतच्या प्रश्नांना उत्तरे देतात. तर, इतर प्रश्नांना महापालिकेने प्रशिक्षण दिलेल्या मुलांकडून उत्तरे दिली जातात. शासनाची नियमावली सांगितली जाते. चाईल्ड हेल्पलाईनसाठी शिक्षकांमार्फत दोन प्रश्नावली मागविली होती. आहार आणि काळजी घेण्याविषयी 101 प्रश्न होते. सुरुवातीला शाळा कधी सुरु होणार याबाबत मुलांकडून जास्त चौकशी होत होती. तिस-या लाटेपर्यंत हेल्पलाईन चालू ठेवण्यात येणार आहे. ही नावीन्यपूर्ण संकल्पना आहे.

विद्यार्थीभीमुख ही हेल्पलाईन आहे. चिंचवड आणि थेरगाव भागातील विद्यार्थ्यांचे सर्वाधिक कॉल आले. आजअखेर 124 कॉल आले आहेत. पूर्वी सोमवार ते शुक्रवार हेल्पलाईन चालू ठेवली होती. आता सार्वजनिक सुट्टीलाही चालू ठेवली जाते. सकाळी 11 ते 1 या वेळेत कॉल स्वीकारले जातात. रविवारी फक्त बंद असते”, असेही भोजने यांनी सांगितले.

लहान मुलांच्या मनात कोरोनाची भीती असल्यास ती दूर करण्यासाठी तसेच कोरोनासंबंधी लहान मुलांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी चाईल्ड हेल्पलाईनच्या 7768800333 आणि 7768900333 या क्रमांकावर फोन करण्याचे महापालिकेकडून आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.