Pune : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भारताचा 73 फुटी तिरंगा युरोपच्या सर्वोच्च शिखराच्या बेसकॅम्पवर फडकला

एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोरर मार्फत विश्वविक्रम; खास कोल्हापुरी फेटा बांधून पूरग्रस्तांना प्रेरणा

10 वर्षाचा साई कवडे, सागर नलावडे, भूषण वेताळ, तुषार पवार, आनंद बनसोडे यांनी केला विश्वविक्रम

एमपीसी न्यूज – 360 एक्सप्लोरर मार्फत एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्यासोबत सह्याद्रीच्या मावळ्यांनी अफलातून विश्वविक्रम केला असून भारताच्या 73 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त 73 फुटी तिरंगा युरोपातील सर्वोच्च शिखर माउंट एलब्रुसच्या बेसकॅम्पवर फडकवला असून 10 वर्षाचा साई कवडे, तुषार पवार, भूषण वेताळ , सागर नलावडे आनंद बनसोडे यांचा या मोहिमेत समावेश आहे. आनंद बनसोडे यांनी जुलै 2014 मध्ये हे शिखर सर केले होते आता या टीमला मार्गदर्शक म्हणून पुन्हा या मोहिमेवर आले आहेत.

360 एक्सप्लोरर मार्फत 15 ऑगस्ट रोजी युरोपातील सर्वोच्च शिखरावर तिरंगा फडकवण्याची मोहीम आयोजित केली गेली होती. यात 10 वर्षाचा साई कवडे हा एलब्रूस शिखर सर करणारा आशियातील सर्वात लहान मुलगा ठरणार आहे. 15 ऑगस्ट रोजी अंतिम चढाईला निघण्यापूर्वी आनंद बनसोडे, साई कवडे, कोल्हापूरचा सागर नलावडे, औरंगाबादचा भूषण वेताळ, साताऱ्याचा तुषार पवार यांनी 73 फुटी तिरंगा एलब्रूस बेसकॅम्प (13000 फूट) वर फडकावून विदेशात सर्वात लांब तिरंगा फडकवण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. याची नोंद वेगवेगळ्या बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये होणार आहे असे 360 एक्सप्लोररचे एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी सांगितले.

एलब्रूस मोहिमेनंतर 360 एक्सप्लोररची टीम भारतात येऊन लगेच कोल्हापूर सांगली येथे पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी जाणार आहे. कोल्हापूर-सांगली येथील पूरग्रस्त लोकांना या संकटातून सावरण्याची प्रेरणा देण्यासाठी युरोपातील सर्वोच्च शिखराच्या बेसकॅम्पवर खास कोल्हापुरी फेटा बांधून या टीमने तिरंग्याला अभिवादन केले.

360 एक्सप्लोरर ची ही विश्वविक्रमी टीम छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडावरील माती, छत्रपतींची प्रतिमा एलब्रूस शिखरावर घेऊन जाणार आहे. पुण्यातील साई कवडे हा सर्वात लहान आशियाई या शिखरावर प्रथम पाऊल ठेवणार आहे त्यामुळे गिर्यारोहन क्षेत्रातील संपूर्ण देशाचे लक्ष या मोहिमेकडे लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.