Pimpri News : संविधान दिनानिमित्त शुक्रवारी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शुक्रवार दि. 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती महापौर उषा ढोरे यांनी दिली.

सकाळी 10 वाजता महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस महापौर ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला जाणार आहे. यानंतर महापालिका अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले जाणार आहे.

सकाळी 10.45 वाजता पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास महापौर ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन त्याठिकाणी नागरिकांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले जाईल.

पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारील मैदानात सकाळी 11 वाजता ‘भारतीय संविधान‘ या विषयावर संविधान अभ्यासक श्रीकांत लक्ष्मीशंकर यांचे व्याख्यान, दुपारी 2 वाजता ‘भारतीय राज्यघटनेतील संसदीय लोकशाही’ या विषयावर संविधान तज्ञ प्रा. उल्हास बापट यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. दुपारी 3 वाजता गायक सुधाकर वारभुवन यांचा गीतगायनाचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होईल.

सायंकाळी 5 वाजता ‘भारतीय संविधान आणि समाज’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले असून यामध्ये ह.भ.प. अजय महाराज बारस्कर, गोविंद दळवी, प्रा. अजिंक्य चांदणे, मौलाना अलिम अन्सारी, भन्ते नागघोष सहभागी होणार आहेत.

सायंकाळी 6 वाजता ख्यातनाम गायक विजय सरतापे आणि राहूल शिंदे यांचा प्रबोधनात्मक संविधान गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. तसेच सृष्टी चौक, पिंपळेगुरव येथे सायंकाळी 7 वाजता सुप्रसिध्द गायिका रेश्मा सोनवणे आणि संकल्प गोळे यांचा प्रबोधनात्मक आणि भीमगीतांचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे.

या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहून भारतीय संविधानाच्या प्रचार आणि प्रसाराच्या मोहिमेत नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन महापौर ढोरे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.