Pune News: संविधानाच्या मार्गावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्थान दीपगृहाप्रमाणे – डॉ. नीलम गो-हे

एमपीसी न्यूज – संविधानाच्या इतिहासात भारतीय लोकशाहीची बिजे रोवलेली आहेत. वैचारिक सुधारणा, जीवन मूल्यांचा संघर्ष, जन्मजात भेदभावांना झुगारून समानतेचे मूल्य स्वीकारणे हा संविधानाचा मूलभूत भाग आहे. संविधानाच्या मार्गावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्थान दीपगृहाप्रमाणे, असे मत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी व्यक्त केले. प्रबोधनाच्या परंपरामुळेच पुरस्कारास पात्र ठरल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

71 व्या संविधान दिण्याच्या निमित्ताने पुण्यातील विविध 20 संघटनांच्या वतीने डॉ. गो-हे यांचा संविधान रत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनाही डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, महाराष्ट्र व पुण्यात काम करणाऱ्या वीस संघटना या निमीत्ताने एकत्र येऊन मला हा ‘संविधान रत्न’ पुरस्कार दिला आहे. त्याबद्दल मी ऋणी आहे. 21 नोव्हेंबर 2020 हा दिवस संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्म्यांचा स्मृतीदिन आहे. 21 नोव्हेंबर 1955 रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना व्हावी यासाठी प्रचंड जनआंदोलन उभे करण्यात आले होते.

सध्याच्या स्थितीत काही आव्हाने व काही शक्तीस्थाने संविधानाची मूल्ये, तत्व विचार व कृती यासाठी समोर दिसतात. पर्यायी घटनेला तयार करून जातपंचायतीच्या नावाने कायद्याच्या चौकटीला हरताळ फासणाऱ्या प्रवृती, जातींच्या चौकटी बाहेरच्या स्वेच्छा विवाहांना विरोध करून “ऑनर किलिंगच्या घटना, सामाजिक माध्यमांवरील स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊन मुलांचे लैंगिक शोषण, व्यापार, महिलांची फसवणूक-ब्लॅकमेलिंग, झुडबळी  ही आव्हाने आहेत. तर, सशक्त व जागरुक  न्यायसंस्था, पोलीस यंत्रणेतील सेवाभावी व निरपेक्ष पोलीस अधिकारी कर्मचारी, शिक्षण-वैद्यकीय सेवा- समाजसेवा- उद्योग आदी क्षेत्रात निरपेक्ष कामालाच महत्व देणारे व्यक्ती, प्रवृत्ती, ही सामाजिक शक्तीस्थाने आहेत, असेही त्या म्हणाल्या.

डॉ. सबनीस म्हणाले, राजकीय व्यवस्था सोयीचा आणि स्वार्थाचा विचार करते. देशाचा विचार करत नाही. म्हणून जनता जागरूक असायला हवी.

अध्यक्ष अँड. प्रमोद आडकर, साहित्य कला प्रसारणी सभेचे अध्यक्ष, स्वागताध्यक्ष सचिन इटकर, नगरसेविका  लता राजगुरू, रवींद्र माळवदकर, अविनाश बागवे, डॉ.गौतम बेंगाळे, दादासाहेब सोनावणे, विठ्ठल गायकवाड, अमोल देवळेकर, शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, विवेक चव्हाण, आशा कांबळे, किरण साळी आदी यावेळी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.