Pimpri News: शहर कोरोनाच्या दुस-या लाटेच्या वाटेवर?

दिवाळीनंतरच्या सहा दिवसांत तब्बल 1 हजार नवीन रुग्ण

एमपीसी न्यूज – पालिकेने चाचण्यांचे प्रमाण वाढविले नसतानाही  दिवाळीनंतर पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत आहे. दिवसाला दीडशेहून अधिक नवीन रुग्णांची भर पडत आहेत. मागील सहा दिवसांत तब्बल 1 हजार 6 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 30 जणांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता व्यक्त केली जात असून शहर कोरोनाच्या दुस-या लाटेच्या वाटेवर जाते की काय अशी भीती वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येईल, अशी भीती वर्तविली जात होती. दिवाळीनंतर शहरातील रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क वापरणे, हात सॅनिटायझ करणे, सुरक्षित अंतर या कोरोनाच्या नियनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पालिकेकडून केले जात आहे. दिवाळी अगोदर उतरणीस आलेला कोरोनाचा आलेख पुन्हा वाढत आहे. धोका टळला नसून नागरिकांनी अधिक खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनासह राजकीय नेत्यांकडून देखील शहरवासीयांना केले जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून आजपर्यंत शहरातील 90 हजार 696 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचे प्रमाण 2.75 टक्के आहे. कोरोनाची लागण झालेल्यांपैकी सुमारे 87 हजार 275 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुमारे 96 टक्के असून मृत्यूदर 1.25 टक्क्यांच्या आसपास आहे. शहरातील 33.9 टक्के नागरिकांना कोरोना होऊन गेला आहे. सुमारे साडे आठ लाख नागरिकांमध्ये अँटिबॉडीज (प्रतिपिंड)  विकसित झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

सप्टेंबर महिन्यापासून शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आली. ऑक्टोबरपर्यंत रुग्णसंख्या पाचशेच्या आतमध्ये आली होती. त्यानंतर शंभरच्या आतच रुग्ण सापडत होते. मृत्यूचे प्रमाणही कमी झाले होते. एका दिवशी एकही मृत्यू झाला नव्हता. ही दिलासादायक बाब मानली जात होती. पण, दिवाळी सणात नागरिकांनी बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी केली. मास्क परिधान करणे, हात सॅनिटायझ, सुरक्षित अंतर या नियमांचे पालन झालेले दिसून आले नाही. त्यामुळे दिवाळीनंतर रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती राज्य सरकारने व्यक्त केली होती. दिवाळीनंतर रुग्णसंख्या वाढत असल्याने शहर कोरोनाच्या दुस-या लाटेच्या वाटेवर आहे की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे.

_MPC_DIR_MPU_II

पालिकेने चाचण्यांचे प्रमाण वाढविले नाही. तरी, देखील मागील सहा दिवसात रुग्णसंख्येत वाढ होत आहे. दिवाळी सणानंतर रुग्णवाढीचे प्रमाण वाढले आहे. दिवसाला दीडशेहून अधिक नवीन रुग्णांची नोंद होत आहे. सोमवारी (दि.16) दिवाळी संपली. त्यानंतर मंगळवारी (दि.17) 98 नवीन रुग्ण तर 8 मृत्यू,  बुधवारी 158 रुग्ण 4 मृत्यू, गुरुवारी 179 रुग्ण 5 मृत्यू,  शुक्रवारी 164 रुग्ण 8 मृत्यू, शनिवारी 192 रुग्ण 5 मृत्यू, रविवारी 215 नवीन रुग्ण तर एकही मृत्यू झाला नाही. सहा दिवसात तब्बल 1 हजार 6 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 30 जणांचा मृत्यू झाला आहे. वाढती रुग्णसंख्या  चिंताजनक आहे.

याबाबत बोलताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ”हिवाळा सुरू झाला आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसल्यास डॉक्‍टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत. लक्षणे दिसताच तत्काळ कोरोनाची चाचणी करुन घ्यावी. कोरोनाची दुसरी लाट आली नाही. येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पालिकेची वैद्यकीय यंत्रणा सज्ज आहे.  रुग्णसंख्या वाढली. तर, सुरक्षितता म्हणून आयसीयू व ऑक्‍सिजनयुक्त यंत्रणा सज्ज ठेवलेली आहे. नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. हात वारंवार धुत रहावे, सॅनिटायझ करावेत. सुरक्षित अंतर बाळगावे”, असे आवाहनही त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.