Chinchwad Crime News : धक्कदायक! पोलीस ठाण्यातील तपास पथकाच्या कक्षात जाऊन पोलिसांना मारहाण

एमपीसी न्यूज – पोलीस ठाण्यातील तपास पथकाच्या कक्षात जाऊन पोलिसांना धक्काबुक्की करून मारहाण केल्याचा प्रकार रविवारी (दि. 26) दुपारी चिंचवड पोलीस ठाण्यात घडला. याप्रकरणी एकाच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

लुकमान इस्माईल शेख (वय 56, रा. वेताळ नगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस शिपाई अमोल माने यांनी या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लुकमान शेख याचा मुलगा समीर लुकमान शेख (वय 22) कोयता बाळगत असल्याचे लक्षात आले.  दरम्यान, फिर्यादी हे तपास पथकात कर्तव्य बजावत असताना ते समीर शेख याच्याकडे चौकशी करून तपास करीत होते.

त्यावेळी आरोपी चिंचवड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाच्या कक्षामध्ये आला. तेथे त्याने मोठमोठ्याने आरडाओरडा करून तपास पथकाच्या ऑफिसमध्ये घुसून फिर्यादी करीत असलेल्या सरकारी कामकाजात अडथळा निर्माण केला. तसेच फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांना धक्काबुक्की करून हाताने मारहाण सुद्धा केली.

पोलिसांनी लुकमान शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली असून याप्रकरणी चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.