Pune : डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्याप्रकरणी औरंगाबाद येथून एकास अटक; चौकशी सुरू

एमपीसी न्यूज – डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणी औरंगाबाद येथून एकास अटक करण्यात आली आहे. तब्बल पाच वर्षानंतर सीबीआयला नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात दुसरी मोठी कारवाई करण्यात यश आले आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यावर थेट गोळ्या झाडणा-या आरोपीला सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. सचिन अंधुरे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. औरंगाबादमधून सचिन अंधुरेला सीबीआयने ताब्यात घेतले आहे.

पुण्यातील ओंकारेश्वर पुलाजवळ 20 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी सव्वासातच्या सुमारास दाभोळकरांवर दोन जणांनी पाठीमागून गोळ्या झाडून त्यांची निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणात एका काळ्या दुचाकीचा वापर आरोपींनी केला होता.

दहशतवाद विरोधी पथक ठाणे यांनी काही दिवसांपूर्वी तिघांना बेकायदेशीररित्या हत्यार बाळगल्या प्रकरणी अटक केली होती. चौकशी दरम्यान त्यांच्यापैकी एकाने दाभोळकरांच्या हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभागी असल्याचे सांगितले. तसेच त्यासोबत आणखी एकाचा सहभाग असल्याचे सांगितले. त्यानंतर ही माहिती दाभोळकर हत्या प्रकरणाचा तपास करणा-या सीबीआय अधिका-यांकडे देण्यात आली. त्यानुसार पुढील चौकशी करून सीबीआयने औरंगाबाद येथून आरोपीला अटक केली असून चौकशी सुरू आहे.

दरम्यान, या कारवाईमुळे या हत्या प्रकरणातील मोठे धागे दोरे उलगडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच यामध्ये अन्य कोणाचा सहभाग आहे, या माहितीकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.