Sangvi Crime News : नातेवाईकाच्या घरी चोरी करून फायनान्स कंपनीत ठेवले दागिने गहाण; आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – सांगवी परिसरात 8 ऑक्टोबर रोजी एक घरोफोडीचा गुन्हा घडला. हा गुन्हा नात्यातील एका तरुणाने केला असून त्याने चोरी केलेले दागिने मणप्पुरम फायनान्स कंपनीत गहाण ठेवले असल्याचे तपासात निष्पन्न झाले. सांगवी पोलिसांनी आरोपीला अटक केली.

माधव बालाजी खराबे (वय 28, रा. विनायक नगर, पिंपळे गुरव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पिंजण यांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 ऑक्टोबर रोजी सांगवी परिसरात एक घरफोडीचा गुन्हा घडला. घरमालक गोवा येथे फिरायला गेला असता एका चोरट्याने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले होते. चोरट्याने पाच लाख 66 हजारांचा ऐवज चोरून नेला होता. त्यानुसार सांगवी पोलीस तपास करीत होते.

घरातील एका कपाटाला रक्ताचे डाग पोलिसांना आढळले. त्यानुसार पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता एक तरुण लंगडत, तोंडाला रुमाल बांधून परिसरात रेंगाळताना दिसला. तोच तरुण पिंपळे गुरव येथील सोनाराच्या दुकानात सोन्याचे दागिने विक्रीसाठी फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला सापळा लावून ताब्यात घेतले.

सुरुवातीला त्याच्या जखमा आणि त्यांच्याकडे असलेल्या सोन्याच्या चेन बाबत विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला पोलीस ठाण्यात आणून कसून चौकशी केली असता त्याने ही चोरी केल्याचे कबूल केले. तसेच ज्या घरात चोरी केली तो आरोपीचा नातेवाईक असल्याचे देखील निष्पन्न झाले. आरोपीने चोरलेले दागिने फुगेवाडी येथील मणप्पुरम फायनान्स कंपनीत गहाण ठेवले होते. पोलिसांनी आरोपीकडून पाच लाख 58 हजारांचे दागिने जप्त केले.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस अंमलदार चंद्रकांत भिसे, कैलास केंगले, सुरेश भोजणे, अरुण नरळे, शशिकांत देवकांत, नितीन खोपकर, अनिल देवकर, प्रमोद गोडे, विवेक गायकवाड, प्रवीण पती, विजय मोरे, सागर सूर्यवंशी, हेमंत हांगे, हेमंतकुमार गुत्तीकोंडा, शिमोन चांदेकर, सुहास डंगारे, नूतन कोंडे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.