Chakan Crime News : छातीत चाकू भोसकून खून; दोन तासांत आरोपीला अटक

अपशब्द वापरल्यावरुन झाला होता वाद

एमपीसी न्यूज – अपशब्द वापरल्याने झालेल्या वादात छातीत चाकू भोसकून एकाचा खून केला. पवार वस्ती, खराबवाडी, ता. खेड, पुणे येथे आज (शुक्रवारी, दि.08) ही घटना घडली. चाकण पोलिसांनी (म्हाळुंगे चौकी) दोन तासांत आरोपीला अटक केली आहे.

शिवम कैलास नारायण यादव असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. अर्जुन रामलखन यादव (वय 23, रा. बिष्णुपुरा, ता. भातपारानी, जि. देवरीया, उत्तरप्रदेश) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अर्जुन यादव याचे लग्न जमल्याने धर्मेंद्रसिंग हरिसिंग सिसोदीया हा आरोपीच्या घरी जेवण करण्यासाठी गेला होता. धर्मेंद्रसिंग याने अपशब्द वापरल्यामुळे अर्जुन यादव याने धर्मेंद्रसिंग यास शिवीगाळ करुन जेवण न देता घराबाहेर काढले.

धर्मेंद्रसिंग याने घडला प्रकार त्याच्या मित्रांना फोनवरुन सांगितला. धर्मेंद्रसिंग यांचे मित्र जाब विचारण्यास अर्जुन यादव याच्या घरी गेले. त्याठिकाणी अर्जुन यादव व आलेल्या लोकांमध्ये वाद झाला व अर्जुन यादव याने शिवम कैलास नारायण यादव याच्या छातीत चाकू भोसकून खून केला.

गुन्हे शाखा युनिट तीनच्या मदतीने गुन्हा घडल्यानंतर दोन तासांत आरोपीला अटक करण्यात आली. पुढील तपासासाठी न्यायालयाकडून आरोपीची पोलीस कस्टडी घेण्यात येणार आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप-आयुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.