Nigdi : पंधरा वर्षीय विद्यार्थ्याच्या खुन प्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज – पंधरा वर्षीय एका विद्यार्थ्याचा गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला. निगडी येथील पूर्णानगर मध्ये हा प्रकार घडला. प्रेमप्रकरणातून खून झाला असून याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

वेदांत जयवंत भोसले (वय 15, रा. पूर्णानगर) असे खून झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. रोहित प्रदीप मागीकर (वय १८, रा.पूर्णानगर, निगडी) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत वेदांत ज्या मुलीसोबत अभ्यास करायचा त्या मुलीवर संशयित आरोपी रोहन हा प्रेम करायचा. वेदांत अभ्यासाच्या माध्यमातून त्या मुलीच्या जवळ येत असल्याचा समज रोहनचा झाला होता. याच कारणावरून वेदांत याचा खून झाला असल्याचे तपासात समोर आले आहे.

सोमवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास पूर्णानगर येथील जुन्या आरटीओ च्या मागच्या बाजूला एक तरुण जखमी अवस्थेत पडला असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार निगडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेतली. रस्त्यावर मयत वेदांत गंभीर जखमी अवस्थेत पडला होता. त्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी वेदांतला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. वेदांत निगडी येथील माता अमृता शाळेमध्ये इयत्ता दहावीच्या वर्गात शिकतो. सोमवारी रात्री उशिरापर्यंत तो आपल्या मैत्रिणीसोबत अभ्यास करीत होता. अभ्यासाला उशीर झाल्याने तो मैत्रिणीला तिच्या घरी सोडविण्यासाठी गेला. परतत असताना त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाला. हल्ल्यात त्याच्या गळ्याला गंभीर जखम झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.


पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.