Wakad : वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की केल्याप्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज – मोबईल फोनमध्ये शूटिंग करताना वाहतूक पोलिसाने एकाला हटकले. यावरून शूटिंग करणारा व्यक्ती मोबईल सोडून पळून गेला. काही वेळानंतर येऊन त्याने वाहतूक पोलिसासोबत हुज्जत घालून धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. हा प्रकार सोमवारी (दि. 9) रात्री पावणेनऊ वाजता रहाटणी फाटा, वाकड येथे घडला.

निलेश भाऊ माने (वय 46, रा. गजानननगर, रहाटणी, वाकड) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत सहाय्यक पोलीस फौजदार रवींद्र बाळकृष्ण महाडिक (वय 56) यांनी मंगळवारी (दि. 10) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस उपनिरीक्षक संगीता गोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सहाय्यक पोलीस फौजदार महाडिक आणि त्यांचे सहकारी वाहतूक पोलीस सोमवारी रात्री पावणेनऊ वाजता रहाटणी फाटा येथे कर्तव्य बजावत होते. वाहतुकीचे नियम मोडणा-या तसेच मास्क न वापरणा-या नागरिकांवर पोलीस कारवाई करत असताना आरोपी निलेश याने वाहतूक पोलिसांचा व्हिडीओ मोबईल फोनमध्ये शूट केला.

हा प्रकार फिर्यादी सहाय्यक पोलीस फौजदार महाडिक यांच्या निदर्शनास आला. त्यामुळे महाडिक यांनी आरोपी निलेश याला त्याबाबत हटकले. त्यावेळी निलेश मोबईल तिथेच टाकून पळून गेला. काही वेळानंतर निलेश वाहतूक पोलिसांकडे आला. ‘तुम्ही कारवाई का करता. तुम्हाला अधिकार आहे का’ असे म्हणत त्याने वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालून धक्काबुक्की करत मोबईल फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.

याबाबत निलेश याच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी भारतीय दंड विधान कलम 353 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी निलेश याला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.