Bhosari News : चार हजारांचे रेमडेसिवीर इंजेक्शन 48 हजारांना विकणाऱ्या एकास अटक

एमपीसी न्यूज – चार हजार 126 रुपयांना मिळणारे रेमडेसिवीर इंजेक्शन तब्बल 48 हजारांना विकणाऱ्या एकास एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केली आहे.

कृष्णा भास्कर हावणे (वय 25, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या औषध निरीक्षक भाग्यश्री यादव यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनावर उपचार म्हणून वापरण्यात येणारे रेमडेसिवीर इंजेक्शन आरोपी कृष्णा याने 48 हजार रुपयांना विकले. त्या इंजेक्शन विक्रीचा परवाना नसतानाही त्याने इंजेक्शनची बेकायदेशीरपणे विक्री केली. याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती मिळाली. अन्न व औषध प्रशासन विभागाने एमआयडीसी भोसरी पोलिसांसोबत मिळून कारवाई केली.

आरोपी कृष्णा कडून पोलिसांनी 12 हजार 530 रुपये रोख रक्कम, 13 हजार 380 रुपयांची तीन रेमडेसिवीर इंजेक्शन, एक मोबाईल फोन असा एकूण 31 हजार 910 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम 420, औषध नियंत्रण आदेश, जीवनावश्यक वस्तूंचे अधिनियम, औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.