Chikhali Crime News : ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत खंडणीची मागणी; एकजण अटकेत

एमपीसी न्यूज – ‘तू गॅसचा बेकायदेशीर धंदा करतो. तुझी व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करून तुझी समाजात बदनामी करू. तुला प्रकरण मिटवायचे असेल तर एक लाख रुपये रक्कम आम्हाला दे. पैसे दिले नाही तर आमची संघटना चळवळीचे काम करते. आम्ही तुझ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू’, अशी धमकी देत तिघांनी एका व्यावसायिकाकडे खंडणी मागितली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे. ही घटना एक सप्टेंबर ते 13 सप्टेंबर या कालावधीत साने चौक चिखली आणि ओटास्कीम निगडी येथे घडली.

संतोष रामा चव्हाण, अक्षय रामा चव्हाण (वय 26, दोघे रा. चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवड), सचिन गायकवाड अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. तीन आरोपींपैकी अक्षय चव्हाण याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अजय राजेंद्र जैन (वय 31, रा. पाटीलनगर, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून संतोष चव्हाण याने अजय जैन यांना ‘तू गॅसचा बेकायदेशीर धंदा करतो. तुझी व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करून तुझी समाजात बदनामी करू. तुला प्रकरण मिटवायचे असेल तर एक लाख रुपये रक्कम आम्हाला दे. पैसे दिले नाही तर आमची संघटना चळवळीचे काम करते. आम्ही तुझ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू. तुला भांड्याचे दुकान चालवून देणार नाही’,अशी धमकी दिली.

दरम्यान, आरोपींनी वारंवार फिर्यादी यांच्या दुकानात येऊन तसेच फोनवर पैशांची मागणी सुद्धा केली. जैन यांच्या ‘जैन नाकोडा मेटल्स’ या दुकानातून 20 हजार रुपये, ‘अंकुश चौक ओटा स्कीम’, निगडी येथून 20 हजार रुपये असे एकूण 40 हजार रुपये घेतले. त्यानंतर पुन्हा 20 हजार रुपयांची मागणी करत पैसे दिले नाही तर जिवे ठार मारतो अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस या प्रकरणी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.