Chikhali Crime News : केश कर्तनालयातील कारागिराने आठ वर्षीय ग्राहक मुलीसोबत केले अश्लील कृत्य

एमपीसी न्यूज – चिखली परिसरात एका केश कर्तनालयातील कारागिराने त्याच्याकडे केस कापण्यासाठी आलेल्या आठ वर्षीय मुलीसोबत अश्लील कृत्य केले. याप्रकरणी पोलिसांनी कारागिराला अटक केली आहे. दरम्यान, हिंजवडी आणि तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातही बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

चिखली पोलीस ठाण्यात आठ वर्षीय मुलीच्या आईने फिर्याद दिली. त्यानुसार मोहम्मद शेबू मोहम्मद हानिफ सलमानी (रा. चिखली) याला अटक केली आहे. पीडित मुलगी आणि तिची आजी केस कापण्यासाठी केश कर्तनालयात गेल्या होत्या. मुलीचे केस कपात असताना केश कर्तनालयातील कारागिराने पीडित मुलीसोबत अश्लील वर्तन केले. याप्रकरणी केश कर्तनालयातील कारागिराला अटक करण्यात आली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

17 वर्षीय मुलाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

दरम्यान, पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एका 17 वर्षीय मुलाने फिर्यादी यांच्या मुलीसोबत मैत्री करून मुलीला त्याच्या घरी बोलावून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार ऑगस्ट 2021 मध्ये सुसगाव येथे घडला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

तळेगाव दाभाडे येथे 14 वर्षीय मुलीचा विनयभंग

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात 14 वर्षीय पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली. त्यानुसार प्रतीक साळूंखे (वय 20, रा. भोईआळी, तळेगाव दाभाडे) याला पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी यांची पीडित अल्पवयीन मुलगी त्यांच्या घराच्या कंपाउंडच्या आत बसली असताना आरोपीने मुलीचा हात पकडून तिच्याशी गैरवर्तन केले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.