Hinjawadi Crime News : रात्रीच्या वेळी सोबत येण्यास नकार दिल्याने तरुणास बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – रात्रीच्या वेळी सोबत येण्यास तरुणाने नकार दिला असता एकाने तरुणाला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तरुणाची बहीण भांडण सोडविण्यासाठी आली असता तिलाही शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. ही घटना सोवमारी (दि. 11) पहाटे तीन वाजता जांभुळकरनगर, हिंजवडी येथे घडली.

साईनाथ रमेश वाकळे (वय 18, रा. जांभुळकरनगर, हिंजवडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. 13) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयूर कोलथे (रा. जांभुळकरनगर, हिंजवडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे तीन वाजता आरोपी मयूर फिर्यादी यांच्या घरासमोर आला आणि हाक मारून फिर्यादी यांना झोपेतून जागे केले. ‘तू आत्ता माझ्याबरोबर चल’ असे आरोपीने म्हटले असता त्यासाठी फिर्यादी यांनी नकार दिला.

त्यावरून आरोपीने शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी फिर्यादीला मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी यांची बहीण आली असता तिला देखील आरोपीने शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. हातातील कडे फिर्यादी यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. याप्रकरणी हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.