Chakan Crime News : दुकानाच्या बाहेर जाऊन सिगारेट पिण्यास सांगितल्याने एकास दगडाने मारहाण

एमपीसी न्यूज – दुकानात सिगारेट पीत असलेल्या एकाला दूध घेण्यासाठी आलेल्या एका ग्राहकाने दुकानाच्या बाहेर जाऊन सिगारेट पिण्यास सांगितले. त्यावरून सिगारेट पिणा-याने दूध घेण्यासाठी आलेल्या ग्राहकाला दगडाने मारून जखमी केले. तसेच अरेरावीची भाषा वापरून दुकानाला आग लावण्याची धमकी दिली. ही घटना बुधवारी (दि. 27) खेड तालुक्यातील एकतानगर येथे घडली.

मुकेश राजकुमार शहा (वय 40, रा. एकतानगर, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अविनाश जावळे (रा. वाकी, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बुधवारी एकतानगर येथील प्रवीण सुपर मार्केटमध्ये दूध घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी तिथे दुकानात सिगारेट पीत होता. त्यामुळे फिर्यादी यांनी त्याला दुकानाच्या बाहेर जाऊन सिगारेट पिण्यास सांगितले.

त्यावर ‘तू कोण भाई आहेस. मी दुकानाला आग लावून टाकीन’ असे म्हणत अरेरावी केली. फिर्यादी त्याला समजावत असताना त्याने फिर्यादी यांच्या डोक्यात दगड मारून त्यांना जखमी केले. तसेच मोठमोठ्याने शिवीगाळ करून दमदाटी केली. याप्रकरणी चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.